‘नाशिक ढोल’चा राज्यभर दबदबा
By admin | Published: August 30, 2016 01:15 AM2016-08-30T01:15:41+5:302016-08-30T01:33:33+5:30
नाद, लय : वाद्यनिर्मितीबरोबरच ठेकाही ठरतो आकर्षण
स्वप्निल जोशी नाशिक
गणेशोत्सव अन् ‘नाशिक ढोल’ हे समीकरण राज्यात आता रूढ झाले आहे. विशिष्ट पद्धतीने तयार केलेल्या ढोलमुळे निर्माण होणारा ताल आणि ठेका हे नाशिकच्या ढोलचे वैशिष्ट्य आहे. साठ-सत्तर वर्षांपासून अनेक गणेश मंडळांचे आकर्षण ठरलेल्या या ढोल पथकाला यंदाही राज्यातून व बाहेरून मोठी मागणी आहे.
गणेशाचे आगमन व विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्य पथके, साहसी खेळ आणि लेजीम पथकांच्या सहभागामुळेच शोभा येते. त्यासाठीच नाशिकच्या ढोल पथकांना राज्यभरातून मागणी असते. येथील प्रसिद्ध ‘बडे ढोलवाले’ यांचे पथक यंदा बाप्पांचे वाजतगाजत स्वागत करण्यासाठी गुजरातलादेखील जाणार आहे. गुजरातप्रमाणेच एक संघ सांगली, तीन संघ मुंबईला जाणार आहेत.
‘नाशिक ढोल’ या नावाने आज परिचित झालेल्या ढोलच्या सीडी मोठ्या प्रमाणात आहेत. तथापि, त्याची सुरुवात अत्यंत साध्या पद्धतीने १९६९ मध्ये झाली. जुन्या नाशिकमध्ये एकत्र येऊन तालात डबेवादन करू लागणाऱ्यांनी तयार झालेले ढोल गळ्यात अडकवले.
खास नाशिकच्या वेगळ्या ठेक्याची ही पद्धत इतकी रूजत गेली की, वाजवण्याच्या या पद्धतीला महाराष्ट्रात दाद मिळत गेली. आज मुंबई आणि पुण्याच्या अनेक मंडळांमध्ये गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासून नाशिक ढोलच वाजत असून, त्याशिवाय मिरवणूक पूर्णच होत नाही.
बडे ढोलवालेचे काजी गुलाबखान यांनी आठव्या वर्षापासूनच ढोल वाजवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला मोहरमच्या काळात अन्सार समाजाच प्रामुख्याने ढोल वाजवित असे. पूर्वी ढोल वाजविणे हे फक्त अन्सार मंडळींचे काम असे. पुढे हे काम या समाजाने बंद केले आणि गुलाब खान यांच्या पथकाचा उदय झाला. ढोलवादनाबरोबर साहसी खेळांचे प्रदर्शन आणि मानवी मनोरे रचणे यामुळे नाशिक ढोल अधिकाधिक लोकप्रिय झाला. मुंबईतील चेंबूर भागातील सिंधी कॉलनी परिसरात गेल्या ३१ वर्षांपासून बडे ढोलवाले सातत्याने ढोलवादन करत आहेत.
गणेशोत्सवाची चाहूल लागताच दोन-तीन महिने अगोदर ढोल-ताशांचे आगाऊ बुकिंग झालेले असते. अलीकडच्या डीजे तसेच पाश्चात्त्य संगीताच्या जमान्यातही ‘नाशिक ढोल’मध्ये पारंपरिक पद्धतीने वाजवल्या जाणाऱ्या कावडी, धमाल, घोडा, राम-लखन यांसारख्या प्रकारावर ठेका धरण्यात गणेशभक्तांना वेगळीच मजा येते. त्यामुळे आजही या वाद्यांचे महत्त्व टिकून आहे.
गुलाब खान यांच्या ‘नाशिक ढोल’ पथकात आठ जणांचे पाच गट असून, प्रत्येक गटांत चार ढोल, दोन ताशे, दोन झांजरी या वाद्यप्रकारांचा समावेश आहे. अशी सात पथके खान यांनी बनविली आहेत. नाशिक ढोल मराठी, नाशिक ढोल कावडी, पंजाबी, सिंधी, गुजराथी तसेच गणपतीच्या आरतीवर आधारित विशिष्ट अशा आरती ढोलचीदेखील निर्मिती गुलाब खान यांनी केली आहे.