नाशिककरांना पाऊस झाला नको नकोसा...महापालिका गेली पाण्यात; दिवाळीच्या ‘खरेदी-विक्री’वर फिरले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 04:25 PM2017-10-12T16:25:41+5:302017-10-12T16:46:27+5:30
एकूणच पालिकेच्या गलथान कारभारामुळे ठिकठिकाणी पावसाचे पाणी तुंबले आहे. सखल परिसरासह रस्त्यांवरील चौकांमध्ये सिग्नलवरही पावसाचे पाण्याचे तळे पहावयास मिळत आहे.
नाशिक : शहरात मागील चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून मंगळवार वगळता पावसाचा जोर आजपर्यंत कायम आहे. दुपारी पावणेतीन वाजेपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली असून महापालिकेचे मुख्यालय असलेल्या शरणपुररोडवरील राजीव गांधी भवन मुख्यालयाला पाण्याचा वेढा पडला. पालिकेच्या द्वारावर पावसाच्या पाण्याचे तळे साचले आहे. पालिकेच्या द्वारावर हे दृश्य बघून शहरातील रहिवाशी भागात काय अवस्था असेल, याचा सहज अंदाज नाशिककर बांधत आहे. एकूणच पालिकेच्या गलथान कारभारामुळे ठिकठिकाणी पावसाचे पाणी तुंबले आहे. सखल परिसरासह रस्त्यांवरील चौकांमध्ये सिग्नलवरही पावसाचे पाण्याचे तळे पहावयास मिळत आहे.
बुधवारी सकाळपासून शहरात ढगाळ हवामान कायम असल्याने दुपारी तीन वाजेपासून पावसाला जोरदार सुरूवात झाली. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत नाशिक शहरात बुधवारी २०.२ मि.मि इतका विक्रमी पाऊस पडला. त्यानंतर मात्र पावसाने आज दुपारपर्यंत विश्रांती घेत नाशिककरांना दिलासा दिला. सकाळी कडक ऊन पडले होते. मात्र पुन्हा दुपारी दोन वाजेपासून पावसाला सुरूवात झाली आहे. शहरातील उपनगरीय परिसरातही जोरदार पाऊस सुरू असल्याने नाशिककरांची दिवाळीची खरेदी ‘पाण्यात’ गेली आहे. सलग चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांसोबत विक्रेत्यांचीही चिंता वाढली आहे. ऐन व्यवसायाच्या हंगामात पावसाची सुरू असलेली हजेरीमुळे तारांबळ उडत असून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विक्रीसाठी दुकानांमध्ये भरलेला माल तसाच पडून असल्याने व्यावसायिक वर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे. दिवाळीला अवघा आठवडा शिल्लक राहिला असून पाऊस दररोज दुपारपासून संध्याकाळपर्यंत हजेरी लावत असल्यामुळे खरेदीसाठी नागरिकांना बाहेर पडणे मुश्कील होत आहे.
शुक्रवार हा पावसाचा अखेरचा वार असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे नागरिकांना ‘वीकेण्ड शॉपिंग’करावी लागणार आहे. एकूरच शहरातील बाजारपेठा सध्या सुन्या झाल्या असून शनिवारपासून गजबज पहावयास मिळण्याची शक्यता आहे. गोदावरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. गोदावरीवरील अहल्यादेवी होळकर पूलाखालून पुढे नदीपात्रात ३हजार १११ क्युसेक पाण्याचा प्रवाह सुरू आहे.