नाशिक, दिंडोरीत मतदानाचा टक्का वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2019 01:10 AM2019-05-01T01:10:23+5:302019-05-01T01:10:41+5:30
नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघात लोकसभेसाठी सोमवारी झालेल्या मतदानात मतदारांनी उत्स्फूर्तपणे आपला हक्क बजावल्याने मतदानाचा टक्का वाढला आहे.
नाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघात लोकसभेसाठी सोमवारी झालेल्या मतदानात मतदारांनी उत्स्फूर्तपणे आपला हक्क बजावल्याने मतदानाचा टक्का वाढला आहे. नाशिक मतदारसंघात गेल्या वेळपेक्षा अर्ध्या टक्क्याने वाढ झाली असली तरी, दिंडोरीत मात्र हेच प्रमाण १४ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. निवडणूक आयोगाने मतदारांसाठी दिलेल्या विशेष सोयी व सामाजिक संस्था, संघटनांकडून मतदानासाठी करण्यात आलेल्या आवाहनामुळे मतदानाची टक्केवारी वाढल्याचा अर्थ काढला जात आहे. सोमवारी सायंकाळी ६ वाजता मतदान आटोपल्यानंतर तब्बल २४ तासांनंतर मतदान यंत्रे अंबडच्या गुदामात सीलबंद करण्यात आले आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक मतदारसंघात १९०७ व दिंडोरी मतदारसंघासाठी १८८४ मतदार केंद्रांत सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. नाशिकपेक्षा दिंडोरी मतदारसंघातील ग्रामीण भागात मतदारांचा सकाळपासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. सकाळच्या दोन तासांत दिंडोरीत जवळपास ७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता, त्यामानाने नाशिक मतदारसंघात हे प्रमाण काहीसे कमी होते. त्यानंतर मात्र ९ वाजेपासून शहरी भागातील मतदार मतदानासाठी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले. दुपारी १ वाजेपर्यंत दोन्ही मतदारसंघात मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. त्यानंतर मात्र उन्हामुळे मतदानाचा टक्का थंडावला. दुपारी १ ते ३ या काळात नाशिक मतदारसंघात अवघे तीन टक्के मतदान झाले, तर दिंडोरीत हेच प्रमाण दहा टक्क्यांपर्यंत पोहोचले. शेवटच्या तीन तासांत मात्र पुन्हा एकदा मतदारांची गर्दी दिसून आली.
सायंकाळी सहानंतरही काही मतदार केंद्रांवर रांगा लागल्याने त्या सर्वांना मतदान करू देण्यात आले. सोमवारी जिल्हा प्रशासनाकडून मतदानाची अंदाजे आकडेवारी जाहीर करण्यात आली होती. तथापि, मंगळवारी दुपारपर्यंत सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्रे अंबडच्या सेंट्रल वेअर हाउसला आणण्यात आल्यानंतर मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्यात नाशिक मतदारसंघात ५९.४० टक्के, तर दिंडोरीत ६५.४४ टक्के मतदान झाले. सन २००४ मध्ये हेच प्रमाण नाशिकमध्ये ५८.८२ टक्के, तर दिंडोरीत ६३.४० टक्के मतदान झाले होते. यंदा दोन्ही मतदारसंघात सर्वाधिक मतदानाचा मान दिंडोरी विधानसभेला मिळाला. दिंडोरी विधानसभा मतदारसंघात ७५.०५ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. त्या खालोखाल कळवण विधानसभा मतदारसंघात ७२.५३ टक्के मतदान झाले. नांदगावमध्ये ५७.४९ टक्के, चांदवडला ६५.०७ टक्के, येवला ६१.१५ टक्के, निफाडला ६३.३१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नाशिक लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान इगतपुरी विधानसभा मतदारसंघात ६७.४१ टक्के झाले. त्याखालोखाल सिन्नरला ६४.९७ टक्के, देवळाली ६०.७२ टक्के, नाशिक शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात कमी मतदान झाले आहे. त्यात नाशिक पूर्वमध्ये ५५.०६ टक्के, नाशिक मध्य ५५.९५ टक्के, तर नाशिक पश्चिम मध्ये ५५.६१ टक्के मतदान झाले. सर्वच उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाल्याने आता २३ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे साऱ्यांचेच लक्ष लागून आहे.