नाशिकचे दिग्दर्शक आंबेडकर यांच्या लघुपटाला सलग दुसरा राष्ट्रीय पुरस्कार!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 05:29 PM2023-05-04T17:29:25+5:302023-05-04T17:30:44+5:30
दिल्लीत होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार लघुपटाचे दिग्दर्शक आंबेडकर यांना दिला जाणार आहे.
नाशिक : राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांनी आयोजित केलेल्या ८ व्या राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत दिग्दर्शक नीलेश आंबेडकर यांच्या ‘चिरभोग’ या मराठी लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला असून, रुपये दोन लाख, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दिल्लीत होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार लघुपटाचे दिग्दर्शक आंबेडकर यांना दिला जाणार आहे.
या राष्ट्रीय पुरस्कारासाठी एकूण १२३ लघुपट रिंगणात होते. त्यांना मागे टाकत आंबेडकर यांनी या पुरस्काराला गवसणी घातली आहे. हा लघुपट एका मुलाचे समाजात जात आणि जातीनिहाय व्यवसायावर आधारित सतत भेदभाव, हक्क सुनिश्चित करण्यासाठी सिद्धांत आणि व्यवहारातील विरोधाभास उघड करतानाच त्या मुलाच्या अपमानास्पद संघर्षांवर प्रकाश टाकतो. या लघुपटाची निर्मिती राहुल सोनावणे आणि नीलेश आंबेडकर यांनी केली आहे.
दिग्दर्शक नीलेश आंबेडकर वास्तववादी विषय निवडून समाजात बदल घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून प्रतीकांचा वापर करत पडद्यावर कलाकृती सादर करतात. गतवर्षी त्यांच्या ‘मुंघ्यार’ या कलाकृतीला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचा पुरस्कार मिळाला होता. यावर्षी सलग दुसऱ्यांदा हा राष्ट्रीय पुरस्कार मिळणार आहे.