नाशिक जिल्हा परिषद ‘पंचायत राज’च्या दारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 03:53 PM2018-02-15T15:53:46+5:302018-02-15T15:56:14+5:30
गेल्यावर्षी जिल्हा परिषदेत येऊन येथील दप्तर तपासणी आणि कामांची चौकशी करून काही आक्षेप नोंदविले होते. या आक्षेपांसदर्भातील सुनावणी आता मुंबईत सुरू असून, जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी मुंबईला रवाना झाले आहेत.
नाशिक : बळकट पंचायत राज व्यवस्थेमार्फत पूर्णत्ववादी व सर्वसमावेशक तसेच चिरस्थायी ग्रामविकास साधण्यासाठी पंचायत राज विभागाच्या वतीने ग्रामविकासावर लक्ष केंद्रित केले जाते. ग्रामविकासाचे ध्येय असणाऱ्या पंचायत राज समितीने गेल्यावर्षी जिल्हा परिषदेत येऊन येथील दप्तर तपासणी आणि कामांची चौकशी करून काही आक्षेप नोंदविले होते. या आक्षेपांसदर्भातील सुनावणी आता मुंबईत सुरू असून, जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी मुंबईला रवाना झाले आहेत.
स्वर्णजयंती ग्रामविकास योजनेंतर्गत ग्रामीण महाराष्ट्रत सामाजिक न्याय आणि मूलभूत सार्वजनिक सुविधा राबविण्यासाठी असलेल्या विविध योजनांच्या माहितीचा आढावा पंचायत राज समितीकडून घेतला जातो. यासाठी जिल्हा परिषदेच्या कामकाजाची पाहणी करण्यात आली होती. शासकीय योजना, त्यांचे नियोजन, व्यवस्थापन आणि लेखापरीक्षणाच्या पातळीवर जिल्हा परिषदेच्या अनेक फाईल्सची तपासणी करून समितीने स्पष्टीकरणाचाही शेरा मारला असल्याचे समजते. या संदर्भातील त्रुटी आणि निराकरण करण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची विशेष सुनावणी सुरू झाली आहे. बुधवार आणि गुरुवार अशी दोन दिवस सदर सुनावणी होणार आहे.
या सुनावणीसाठी जिल्हा परिषदेचे सर्वच अधिकारी मुंबईकडे रवाना झाल्याने अधिकाऱ्यांच्या दालनाला कुलपे लावण्यात आली होती. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपासून ते उपमुख्य कार्यकरी अधिकारी, तसेच खातेप्रमुखही मुंबईला गेल्याने जिल्हा परिषदेत बुधवारी बऱ्यापैकी शांतता जाणवत होती. गुरुवारीदेखील सुनावणी असल्याने जिल्हा परिषदेचे कामकाज गुरुवारीदेखील ठप्प राहणार आहे. जिल्हा परिषदेचे सर्वच दप्तर पंचायत राजच्या दारी नेण्यात आल्यामुळे दोन दिवस येथील कामकाज ठप्प राहणार आहे.