दिल्लीकडे कूच करण्यासाठी नाशिक जिल्हा पाठीशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:11 AM2021-06-22T04:11:16+5:302021-06-22T04:11:16+5:30
नाशिक : मराठा समाजाच्या मागण्यांसदर्भात राज्याच्या अखत्यारीत असलेल्या सर्व ११ मागण्यांविषयी राज्य सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेणार आहे. परंतु, ...
नाशिक : मराठा समाजाच्या मागण्यांसदर्भात राज्याच्या अखत्यारीत असलेल्या सर्व ११ मागण्यांविषयी राज्य सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेणार आहे. परंतु, मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आता सर्व समाजाची मागणी झालेली असताना आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे काही प्रश्न उपस्थित झाले आहे. त्यामुळे हा प्रश्न आता केंद्राच्या अखत्यारीत असून मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात गरज पडल्यास दिल्लीवर कूच करण्याची गरज पडली तर नाशिक जिल्हा आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही कृषी मंत्री दादा भुसे यांनी मूक आंदोलनात दिली. तर आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीची गरज असल्याचे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. यावरून राज्यातील मंत्र्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर थेट केंद्र सरकारकडे बोट केल्याचे दिसून आले.
कोल्हापूरनंतर मराठा समाजाचे दुसरे मूक आंदोलन सोमवारी (दि. २१) नाशिकमध्ये झाले. या आंदोलनात राज्यातील छगन भुजबळ व दादा भुसे यांसारख्या मंत्र्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे केंद्र सरकार भूमिका महत्त्वाची बनल्याचा अंगुलीनिर्देश केला. दादा भुसे म्हणाले, राज्याच्या अखत्यारीत असलेल्या सर्व मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री लवकच सकारात्मक निर्णय घेऊन मार्गी लावतील. त्यासाठी पुन्हा राज्यात आंदोलन करण्याची गरज पडणार नाही. परंतु, दिल्लीत आंदोलन करण्याची वेळ आली तर नाशिक जिल्हा आपल्या सदैव पाठीशी असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. तर पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्र छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे, यात दुमत नसल्याचे नमूद केले. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे, असे मत व्यक्त करतानाच ओबीसी आक्रोश मोर्चा मराठा आरक्षणाविरोधात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षणासोबतच ओबीसींचे आरक्षण सुप्रीम कोर्टाने नाकारल्याने ओबीसी समाज कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. त्यामुळे ओबींसींचे आक्रोष आंदोलन सुरू आहे. मात्र काही घटकांकडून दोन्ही समाजात वितुष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे आपसात न भांडता भारत सरकारला आरक्षणासाठी साकडे घालू, अशी भूमिका त्यांनी यावेळी व्यक्त केली.
त्यांना खड्यासारखे दूर करा
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी काही घटक मराठा व ओबीसींमध्ये वितुष्ट निर्माण करीत असल्याचा आरोप केला. तर संभाजी राजें छत्रपती यांचे नेतृत्व मराठा समाजाने मान्य केले असून त्यांच्या नेतृत्वात समाज आरक्षणाचा लढा देत आहे. परंतु, यात काही टाळूवरचे लोणी खाणारे घटक खडा टाकण्याचा प्रयत्न करीत असून अशा टाळूवरील लोणी खाणाऱ्यांना खड्यासारखे बाजूला करूयात, असे आवाहन कृषी मंत्री दादा भुसे यांनी केले.