मद्यनिर्मितीत नाशिक जिल्हा ठरला अव्वल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:46 AM2018-04-14T00:46:17+5:302018-04-14T00:46:17+5:30
मंत्रभूमी म्हणून कधीकाळी ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्याने आता मद्यनिर्मितीच्या क्षेत्रातही अव्वल स्थान पटकावले असून, येथील नैसर्गिक व भौगोलिक स्थिती तसेच दळणवळणाच्या सुलभ साधनांमुळे जिल्ह्यातील चारही मद्यनिर्मिती कारखान्यांच्या उत्पादनात वर्षभरात भरघोस वाढ झाल्याने त्यापोटी राज्य उत्पादन शुल्क विभागाला थोडाथिडका नव्हे तर तब्बल १९०० कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. विशेष म्हणजे, संपलेल्या आर्थिक वर्षात सर्वोेच्च न्यायालयाने मद्यविक्रीबाबत कडक नियम करूनही मद्याच्या विक्रीत वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
नाशिक : मंत्रभूमी म्हणून कधीकाळी ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्याने आता मद्यनिर्मितीच्या क्षेत्रातही अव्वल स्थान पटकावले असून, येथील नैसर्गिक व भौगोलिक स्थिती तसेच दळणवळणाच्या सुलभ साधनांमुळे जिल्ह्यातील चारही मद्यनिर्मिती कारखान्यांच्या उत्पादनात वर्षभरात भरघोस वाढ झाल्याने त्यापोटी राज्य उत्पादन शुल्क विभागाला थोडाथिडका नव्हे तर तब्बल १९०० कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. विशेष म्हणजे, संपलेल्या आर्थिक वर्षात सर्वोेच्च न्यायालयाने मद्यविक्रीबाबत कडक नियम करूनही मद्याच्या विक्रीत वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी राष्टय व राज्य महामार्गावर पाचशे मीटर अंतराच्या आत असलेल्या मद्यविक्रीवर बंधने लादली होती. १ एप्रिल २०१७ पासून लागू करण्यात आलेली बंदी जवळपास सहा महिने कायम होती. परिणामी महामार्ग, राज्यमार्गांवरील मद्यविक्रीत मोठी घट झाल्याचे मानले जात होते. न्यायालयाच्या या निर्णयामुळे शासनाच्या करवसुलीतही घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात मात्र संपलेल्या आर्थिक वर्षात नाशिक जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाने मांडलेल्या ताळेबंदात मद्यनिर्मिती व मद्य परवाना शुल्क आकारणीतून तब्बल १९०० कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. सन २०१६-१७ च्या तुलनेत यंदाच्या उत्पन्नात जवळपास २२० कोटी रुपयांनी वाढ झाल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी सांगितले. गेल्या वर्षी १६६२ कोटी रुपयांचे उत्पन्न करापोटी जमा करण्यात आले होते. नाशिक जिल्ह्यातील एकट्या दिंडोरी तालुक्यात तीन मद्यनिर्मितीचे कारखाने असून, त्यात सीग्रॉम व मॅकडॉल या दोन विदेशी मद्याच्या कंपन्यांचा समावेश आहे, तर इगतपुरी तालुक्यातील गोंदे शिवारात भारत डिस्टिलरी हा देशी मद्यनिर्मितीचा कारखाना आहे. वर्षभरात या कंपन्यांनी उत्पादित केलेल्या मद्यनिर्मितीतून जवळपास १८६० कोटी रुपयांचे शुल्क वसूल करण्यात आले असून, ४० कोटी रुपये मद्यविक्रीच्या परवाने नूतनीकरणातून मिळाले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उत्पन्नात वाढ होण्यामागे सीग्रॉम कंपनीच्या उत्पादनात यंदा वाढ झाल्याचे सांगण्यात आले. या कंपनीच्या नगर, कोल्हापूर, नागपूर येथील प्लान्टमध्ये केल्या जात असलेल्या निर्मितीत घट करून कंपनीने नाशिकच्या प्लॉन्टमधूनच अधिकाधिक मद्यनिर्मितीला प्रोत्साहन दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नाशिक जिल्हा चालू वर्षी राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत मद्यनिर्मितीत अव्वल ठरला असून, आगामी काळात त्यात वाढ होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.