नाशिक जिल्हा रुग्णालय : शवविच्छेदन कक्षाची वाट खडतर; स्ट्रेचरवरून मृतदेह नेताना खाली पडण्याचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 02:38 PM2017-12-12T14:38:21+5:302017-12-12T14:45:32+5:30
मोजके स्ट्रेचर जिल्हा रुग्णालयात असून त्यांचीही दुरवस्था कमालीची झाली आहे. स्ट्रेचर ढकलताना त्यांची चाके फिरतात कमी अन् आवाज इतका प्रचंड असतो की आजूबाजुच्या लोकांना कानावर हात ठेवावा लागतो तर विविध कक्षांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्याही मनात धडकी भरते.
नाशिक : येथील जिल्हा शासकिय रुग्णालयामध्ये वाहनांना शिस्त लावण्यात आली असून वाहनतळ रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरून हलविण्याचा निर्णय स्वागतार्ह असला तरी रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरून पाठीमागील बाजूस असलेल्या शवविच्छेदन कक्षाकडे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या पाठीमागील रस्त्याने मृतदेह शवविच्छेदनासाठी नेले जातात; मात्र यावेळी स्ट्रेचरवरून मृतदेह जमिनीवर पडण्याचा धोका संभवतो; कारण सदर रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील डांबर नाहीसे झाल्याने खडतर रस्त्यावरून स्ट्रेचर ढकलताना अधिक ताकद लावावी लागते, अशावेळी मृतदेह स्ट्रेचरवर प्रचंड प्रमाणात हलून खाली पडण्याची शक्यता निर्माण होते. जिल्हा रुग्णालयाच्या आवारात रस्त्यांचे डांबरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्याची गरज आहे; मात्र याबाबत दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे तीव्र नाराजी व्यक्त होत असून शवविच्छेदनासाठी मृतदेह घेऊन जाताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे रस्त्याचे डांबरीकरण करणे गरजेचे असल्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्याचप्रमाणे पाठीमागील बाजूस काही पथदीप बंद असल्यामुळे अंधाराचे साम्राज्य वाढत आहे. रात्रीच्या वेळी अपघातांमध्ये मयत झालेल्या व्यक्तींचे मृतदेह शवगृह किंवा शवविच्छेदन कक्षात घेऊन जाताना तारेवरची कसरत करावी लागते. कारण रस्त्याची झालेली दुर्दशा आणि अंधार यामुळे जे कर्मचारी स्ट्रेचरवरून मृतदेह सुरक्षितरित्या पोहचवितात ते कौतुकास पात्र आहे. कारण सहसा मृत इसमांचे नातेवाईकांपैकीदेखील कोणी यावेळी धाडस करत नाही. शवविच्छेदन कक्षापर्यंत किंवा शवगृहापर्यंत जाण्यासाठी मृत व्यक्तीचे नातेवाईक स्ट्रेचर ढकलण्यास मदतदेखील करीत नाही. काही अपवाद वगळता असेच चित्र असते.
स्ट्रेचरची चाके फिरतात कमी अन् आवाजच होतो जास्त
जिल्हा रुग्णालयाला नवीन चांगल्या दर्जाचे स्ट्रेचर उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. मोजके स्ट्रेचर जिल्हा रुग्णालयात असून त्यांचीही दुरवस्था कमालीची झाली आहे. स्ट्रेचर ढकलताना त्यांची चाके फिरतात कमी अन् आवाज इतका प्रचंड असतो की आजूबाजुच्या लोकांना कानावर हात ठेवावा लागतो तर विविध कक्षांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्याही मनात धडकी भरते. यामुळे स्ट्रेचरची दुरूस्ती करण्यापेक्षा नवीन चांगल्या दर्जाचे स्ट्रेचर प्रशासनाने खरेदी करावेत, अशी मागणी होत आहे. कारण स्ट्रेचरचा वापर जिल्हा रुग्णालयात अधिक होतो. सातत्याने रुग्णांचा वाढता ताण या रुग्णालयावर आहे.
‘कायाकल्प’ने ठरविले प्रथम क्रमांकाचे रुग्णालय
कायाकल्प योजनेअंतर्गत राज्य शासनाचा ५० लाख रुपयांचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार नाशिकच्या जिल्हा शासकिय रुग्णालयाने पटकाविला. या पुरस्काराचा धनादेश मोठ्या आकारात तयार करुन जिल्हा शल्य चिकित्सकाने आपल्या दालनात भींतीवर लावला आहे. एकूणच प्रथम क्रमांक पटकाविलेल्या या रुग्णालयातील स्ट्रेचर व रस्त्यांची झालेली दुरवस्था बघता आश्चर्य व्यक्त होत आहे.