कुत्र्याने तोडले मृत अर्भकाचे लचके, नाशिक जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 01:06 PM2018-09-29T13:06:27+5:302018-09-29T13:24:36+5:30
एका भटक्या श्वानाने बाळाचा मृतदेह तोंडात धरून लचका तोडत नातेवाईकांचा कारभार चव्हाट्यावर आणल्याने खळबळ उडाली व संतापही व्यक्त झाला.
नाशिक : पाच दिवसांच्या बाळाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात नाशिक जिल्हा रुग्णालयाने सोपविल्यानंतर नातेवाईकांनी बाळावर अखेरचे अंत्यसंस्कार करण्याऐवजी जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच बेवारसस्थितीत मृतदेह टाकून दिला. परिणामी शनिवारी (दि.२९) त्यांचा हा हलगर्जीपणा माणुसकीला काळीमा फासणारा ठरला. एक भटक्या श्वानाने बाळाचा मृतदेह तोंडात धरून लचका तोडत नातेवाईकांचा कारभार चव्हाट्यावर आणल्याने खळबळ उडाली व संतापही व्यक्त झाला.
इगतपुरी तालुक्यातील धामनगाव येथील एका कुटुंबामधील गर्भवती महिला सोमवारी (दि.२४) नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाली. प्रसूतीनंतर नवजात शिशूचे वजन कमी असल्यामुळे नवजात शिशूला अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते; मात्र दुसऱ्या दिवशी शिशूचा मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने कागदपत्रांची पुर्तता करून बाळाचा मृतदेह अंतीम संस्कारासाठी नातेवाईकांना सोपविला. आदिवासी गरीब कुटुंब असलेल्या नातेवाईकांकडे बाळाला घेऊन जाण्यासाठी पैसे नसल्याची बाब पुढे आली असली तरी प्रथमदर्शनी या कु टुंबाने हलगर्जीपणा के ल्याचे उघडकीस आले आहे. कुटुंबातील काही महिला सदस्यांनी बाळाचा दफनविधी करण्याऐवजी जिल्हा रुग्णालयातील उपहारगृहाच्या बाजूला असलेल्या गाजर गवतामध्ये टाकून काढता पाय घेतला. या घटनेला पाच दिवस उलटले. शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास एका भटक्या श्वानाने बाळाचा मृतदेह हुंगला आणि तोंडाने लचका तोडत दाताखाली दाबून परिसरातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. ही बाब नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी श्वानाच्या तोंडातून बाळाचा मृतदेह हिसकविण्याचा प्रयत्न केला; मात्र श्वान मृतदेह सोडत नसल्याचे पाहून काही नागरिकांनी श्वानाला लाठ्या-काठ्यांनी, दगडांनी घाबरविले, गर्दी बघून श्वानाने मृतदेह जमिनीवर टाकला आणि पळ काढला. तत्काळ जिल्हा रुग्णालयाच्या कर्मचा-यांनी बाळाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ताब्यात घेतला. दरम्यान, सरकारवाडा पोलिसांनी पंचनामा करत नोंद केली.
माता अत्यवस्थ; अतिदक्षता विभागात उपचार
इगतपुरी ग्रामिण रुग्णालयात धामनगावातील या कुटुंबातील गर्भवती मातेला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते; मात्र मातेला झटके येऊ लागल्याने त्या रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. सिझेरियन प्रसूतीनंतर बाळाचा जन्म झाला; मात्र बाळ कमी वजनाचे असल्याने अत्यवस्थ होते. अतिदक्षता विभागात उपचार करण्यात आले; मात्र बाळाला वाचविणे शक्य झाले नाही. तसेच मातेचेही प्रकृती गंभीर असल्याने येथील अतिदक्षता विभागात त्या मातेवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी दिली.