नाशिक डिव्हाईन सायक्लोथॉन : रस्ता सुरक्षिततेसाठी नियम पाळण्याचे दिव्यांगांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 05:08 PM2018-02-14T17:08:30+5:302018-02-14T17:21:56+5:30
सायक्लोथॉनची सुरुवात करण्यात आली. यावेळी सामान्य नागरिकांना नेत्र दान, दुचाकी वापरताना हेल्मेट वापरा, रस्ता सुरक्षिततेसाठी नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले.
नाशिक : समाजामध्ये दिव्यांग व्यक्तींप्रती सामान्य नागरिकांमध्ये स्नेहभाव निर्माण व्हावा, जागृती व्हावी त्यांच्या समस्या जाणून घेता याव्यात या उद्देशाने नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड महाराष्ट्र, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन आणि एसकेडी ग्रुप यांच्या संयुक्त प्रयत्नांतून आज व्हॅलेंटाईनडेच्या निमित्ताने 'डिव्हाइन सायक्लोथॉन'चे आयोजन करण्यात आले होते.
नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रसिंग सिंगल, गुरु गोविंदसिंग फाउंडेशनचे गुरदेवसिंग विर्दी,नगरसेविका हेमलता पाटील, प्रियांका घाटे आणि जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती मनीषा पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवत सायक्लोथॉनची सुरुवात करण्यात आली. यावेळी सामान्य नागरिकांना नेत्र दान, दुचाकी वापरताना हेल्मेट वापरा, रस्ता सुरक्षिततेसाठी नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले.
नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन अध्यक्ष जसपाल सिंग विर्दी यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या डिव्हाईन सायक्लोथॉनचे सलग तिसऱ्यावर्षी आयोजित करण्यात आले होते. या डिव्हाईन सायक्लोथॉनमध्ये ८० हुन अधिक अंध मुले-मुली,अस्थिव्यंग, मतीमंद, सेलेब्रल प्लासी, बहुविकलांग, डिफ-ब्लाइंड असे दिव्यांग स्त्री पुरुष सहभागी झाले.
महात्मानगर क्रिकेट ग्राउंड ते भोंसला मिलिटरी स्कुल गेट, कॉलेज रोड अशा मार्गावर झालेल्या या डिव्हाइन सायक्लोथॉनमध्ये दोन चाकी सायकल्स टँडम सायकल्स, लहान मुलांसाठी तीन चाकी सायकल्स, व्हीलचेअर वापरण्यात आल्या.
नाशिक सायकलीस्टच्या सदस्यांनी स्वतःच्या सायकल्स यावेळी उपलब्ध करून दिल्या. गेल्यावर्षी नॅब महाराष्ट्रचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री यांनी सांगितल्याप्रमाणे यावेळी १० दिव्यांगांनी स्वतंत्रपणे सायकल चालवली. सायकल चालविण्याइतपत काहींना प्रशिक्षण आणि सराव घेण्यात आला होता.
या सायक्लोथॉन दरम्यान प्रत्येक दिव्यांग सायकलीस्टच्या सोबत २ व्यक्ती पूर्णवेळ साथ देण्यासाठी उपलब्ध होते. यावेळी टाळ्या आणि चुटक्या यांच्या दिशेने दिव्यांग सायकलीस्ट सायकल चालवताना दिसत होते. यावेळी मदत करणारे नॅब आणि नाशिक सायकलीस्टचे सदस्य या दिव्यांगांच्या दुनियेत हरवून जात सायक्लोथॉन पूर्ण करण्यास मदत करताना दिसले.
यावेळी छत्रपती पुरस्कार विजेते साहसी सायकलिस्ट डॉ. हितेंद्र महाजन आणि महेंद्र महाजन बंधूंचा विशेष सत्कार नाशिक सायकलिस्टच्या वतीने करण्यात आला.