दहावीच्या परीक्षेत नाशिक विभागाचा निकाल २९ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 11:14 AM2018-08-30T11:14:02+5:302018-08-30T11:14:23+5:30
विभागातील १२ हजार ७९१ प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ७३६ विद्यार्थी उत्तीर्ण
नाशिक - महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै -आॅगस्टमध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१०वी) परीक्षेचा निकाल बुधवारी (दि.२९) आॅनलाईन पदधतीने जाहिर करण्यात आला आहे. या परीक्षेत राज्याचा एकुण निकाल २३.६६ तर नाशिक विभागाचा निकाल २९.३५ टक्के लागला आहे.
विभागातील १२ हजार ७९१ प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ७३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती विभागीय अध्यक्ष कृष्णकुमार पाटील यांनी दिली. फेरपरिक्षेत नाशिक विभागात एकही गैरमार्ग प्रकरण आढळून आले नाही. दहावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीसह इतर अभ्यासक्रमात प्रवेशासाठी संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही.
शिक्षण मंडळातर्फे १७ जुलै ते २ आॅगस्ट या कालावधीत फेरपरीक्षा घेण्यात आली होती. नाशिक विभागातील नाशिकसह धुळे, जळगाव, नंदूरबार या जिल्ह्यातील ३७ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत नाशिक विभागात २९.३५ टक्के निकाल लागला. गुणपडताळणीसाठी ३० आॅगस्ट ते ८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येतील.