नाशिक विभागाचा निकाल ८६ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 12:28 AM2018-05-31T00:28:19+5:302018-05-31T00:29:01+5:30
महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, नाशिक विभागाचा निकाल ८६.१३ टक्के इतका लागला.
नाशिक : महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, नाशिक विभागाचा निकाल ८६.१३ टक्के इतका लागला. मागील वर्षीनिकालाची टक्केवारी ८८.२२ इतकी होती. यंदाही विभागात मुलीच हुशार असल्याचे सिद्ध झाले असून, मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९० टक्के इतके आहे. विद्यार्थ्यांना येत्या १२ जून रोजी गुणपत्रकांचे वाटप करण्यात येणार आहे.फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा नाशिक विभागाचा निकाल विभागाचे सचिव मारवाडी यांनी जाहीर केला. त्यानुसार विभागात नाशिक जिल्ह्याचा निकाल ८६.८५ टक्के इतका लागला. धुळे जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक ८८.८७ टक्के, तर जळगाव जिल्ह्याचा निकाल ८४.२० आणि नंदुरबार जिल्ह्याचा निकाल ८४.७० टक्के इतका लागला. विभागाच्या एकूण निकालाची टक्केवारी ८६.१३ इतकी आहे. नाशिक विभागातून १ लाख ६० हजार २८४ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १ लाख ३८ हजार ५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८६.१३ टक्के इतके आहे. विभागातील २२६ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. विभागात एकूण २२४ कॉपीचे गैरप्रकार समोर आले होते.
मुलींचीच बाजी
नाशिक विभागात सातत्याने मुलींनी बोर्डाच्या परीक्षेत झेंडा रोवला आहे. यावर्षीदेखील मुली याला अपवाद नाहीत. विभागातील चारही जिल्ह्यांत मुलींचा वरचष्मा राहिला आहे. विभागात ९१,०४७ मुलांनी परीक्षा दिली होती, त्यातील ७५,३०७ मुले उत्तीर्ण झाली. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८२.७१ टक्के इतके आहे, तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९०.६३ टक्के इतके आहे. विभागात ६९,२३७ मुली परीक्षार्थी होत्या, त्यापैकी ६२,७४८ मुली उत्तीर्ण झाल्या.
पुनर्मूल्यांकनाबाबत
फेब्रुवारी-मार्च २०१८ परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. छायाप्रत मिळाल्यापासून पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विहित शुल्क भरून विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांना अर्ज करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांचेपुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी मंडळाशी संपर्क करावा, असेदेखील आवाहन करण्यात आले आहे.
गुणपडताळणी आणि छायाप्रती
आॅनलाइन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची व्यवस्था परीक्षा मंडळाने केली आहे. यासाठी आवश्यक त्या अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेला आहे. संकेतस्थळावरील अर्जाची प्रत काढून तो अर्ज विद्यार्थ्यांना भरता येणार आहे. यासंदर्भात आवश्यकता असल्यास माहितीसाठी या विभागीय मंडळाकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गुणपडताळणीसाठी संकेतस्थळावरील गुणपत्रिकेच्या साक्षांकित प्रतीसह गुरुवार, दि. ३१ मे ते शनिवार, दि. ९ जूनपर्यंत विहित शुल्क भरून अर्ज करता येणार आहे. छायांकित प्रतीसाठी गुरुवार, दि. ३१ मे ते मंगळवार, दि. १९ जूनपर्यंत विहित शुल्क भरून अर्ज करता येणार आहे.