नाशिक विभागीय मंडळाने समुपदेशक नियुक्त केले
By admin | Published: February 9, 2015 01:49 AM2015-02-09T01:49:35+5:302015-02-09T01:50:03+5:30
नाशिक विभागीय मंडळाने समुपदेशक नियुक्त केले
नाशिक : फेब्रुवारी-मार्चमध्ये होऊ घातलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांवरील तणाव हलका व्हावा आणि त्यांच्यातील परीक्षेची भीती दूर व्हावी याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी नाशिक विभागीय मंडळाने नाशिकसह धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यासाठी समुपदेशक नियुक्त केले आहेत. दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेध विद्यार्थ्यांना लागले आहेत. घरामधून पालकांकडून विद्यार्थ्याच्या मागे अभ्यासाचा तगादा सुरू झाला असताना विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेविषयी भीती निर्माण होऊन ते दडपणाखाली येतात. त्यातूनच बऱ्याचदा काही अनिष्ट घटनाही घडतात. विद्यार्थ्यांना तणावरहित मुक्त वातावरणात परीक्षा देता यावी आणि त्यांच्यामध्ये परीक्षेविषयी असलेली भीती दूर व्हावी यासाठी नाशिक विभागीय मंडळाने यंदाही जिल्हानिहाय समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. ज्या विद्यार्थ्यांना अथवा पालकांना परीक्षेसंबंधी काही तणाव अथवा समस्या असल्यास त्यांनी समुपदेशकांकडे त्याची मांडणी केल्यास योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे. दि. १० फेब्रुवारी ते २६ मार्च २०१५ पर्यंत विद्यार्थी व पालकांसाठी ही हेल्पलाइन उपलब्ध करून देण्यात आली असून, सदर सुविधा ही परीक्षेपूर्वी आणि परीक्षा कालावधीतही सुरू ठेवण्यात येणार आहे. विद्यार्थी व पालकांनी परीक्षेसंबंधी काही समस्या असल्यास अथवा दडपण आले असल्यास संबंधित समुपदेशकांची संवाद साधावा, असे आवाहन विभागीय सचिवांनी केले आहे. (प्रतिनिधी)