धक्कादायक! नादुरुस्त शिवशाही बस मध्ये चालकाची गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 07:44 AM2023-05-25T07:44:31+5:302023-05-25T10:46:45+5:30
रात्री एक वाजेच्या सुमारास सिन्नर आगाराचे वाहन दुरुस्ती पथक पांगरी शिवारात शिंदे वस्ती जवळ आले.
शैलेश कर्पे
सिन्नर: सिन्नर शिर्डी महामार्गावर नादुरुस्त झालेल्या शिवशाही बस मध्ये बस चालकाने पाठीमागच्या सीट वर करगोट्याच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रात्री एक वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
राज्य परिवहन महामंडळ नाशिक आगार १ चे चालक राजू हिरामण ठुबे (४९) रा. दोनवडे ता. नाशिक हे शिर्डी येथून नाशिककडे बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास शिवशाही बस (क्र. एम एच ०९ इ एम १२८०) घेऊन निघाले होते. शिवशाही बस वावी ते पांगरी दरम्यान शिंदे वस्ती जवळ नादुरुस्त झाली. महिला चालकांनी प्रवाशांना अन्य बस मध्ये बसून दिल्यानंतर बस नादुरुस्त झाल्याची माहिती संबंधित आगारांना कळविण्यात आली. त्यानंतर प्रवासी व महिला वाहक निघून गेल्याचे समजते. रात्री एक वाजेच्या सुमारास सिन्नर आगाराचे वाहन दुरुस्ती पथक पांगरी शिवारात शिंदे वस्ती जवळ आले.
यावेळी बस चालक राजू ठुबे याने बस मध्ये पाठीमागच्या शीट वर हँडलला करगोटेच्या साह्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती वावी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी सिन्नर ग्रामीण रुग्णालयात पाठविला. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. पहाटे सहा वाजेच्या सुमारास सिन्नरचे आगार प्रमुख नेरकर यांच्यासह नाशिकच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.