Nashik: वाजे, गोडसे, भगरेंसह शांतिगिरींना निवडणूक अधिकाऱ्यांची नोटीस, ४८ तासांत खुलाशाचे आदेश
By संकेत शुक्ला | Updated: May 7, 2024 14:04 IST2024-05-07T14:03:53+5:302024-05-07T14:04:27+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: निवडणूक विभागाची पूर्वपरवानगी न घेताच सोशल मीडियावर सुरू केलेला प्रचार नाशिक आणि दिंडोरीतील अधिकृत उमेदवारांना चांगलाच अडचणीत आणणार असून हा प्रचार त्वरित थांबविण्यासह ४८ तासांत त्याचा खुलासा करण्याची नोटीस निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी संबंधितांना बजावल्याने खळबळ उडाली आहे.

Nashik: वाजे, गोडसे, भगरेंसह शांतिगिरींना निवडणूक अधिकाऱ्यांची नोटीस, ४८ तासांत खुलाशाचे आदेश
- संकेत शुक्ल
नाशिक - निवडणूक विभागाची पूर्वपरवानगी न घेताच सोशल मीडियावर सुरू केलेला प्रचार नाशिक आणि दिंडोरीतील अधिकृत उमेदवारांना चांगलाच अडचणीत आणणार असून हा प्रचार त्वरित थांबविण्यासह ४८ तासांत त्याचा खुलासा करण्याची नोटीस निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी संबंधितांना बजावल्याने खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासह खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारचे निरीक्षक कार्यरत असून प्रत्येक प्रकारच्या प्रचारासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून पूर्वपरवानगी आवश्यक करण्यात आली आहे. असे असतानाही महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे, अपक्ष शांतिगिरी महाराज, सिद्धेश्वरानंद सरस्वती तर दिंडोरीतील महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांनी परवानगी न घेताच प्रचार सुरू केल्याने हे प्रकरण त्यांना भोवण्याची शक्यता आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी जलज शर्मा व अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी त्यांना नोटीस बजावली आहे. सोशल मीडियावरील प्रचार तातडीने थांबवण्याचे आदेश देत ४८ तासांच्या आत खुलासा करण्याचे आदेश नोटिसीद्वारे बजावले आहेत. त्यामुळे उमेदवारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण
लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांनी सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारचे प्रसारण करताना त्याआधी माध्यम प्रमाणीकरण समितीची (एमसीएमसी) परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र, सोशल मीडियावर विनापरवानगी प्रचार होत असल्याचे माध्यम मॉनिटरिंग विभागाच्या निदर्शनास आले आहे. यानंतर या उमेदवारांना सोशल मीडियावरील प्रचार थांबवण्याचे आदेश दिले आहेत. या नोटीसमुळे उमेदवारांचीही यामुळे डोकेदुखी वाढणार आहे.
एमसीएमसी विभागाची परवानगी न घेताच सोशल मीडियावर प्रचार करणे चुकीचे आहे. यासंदर्भात संबंधित उमेदवारांना नोटीस बजावली असून, त्यांचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
-जलज शर्मा, जिल्हाधिकारी
संबंधित उमेदवाराने रीतसर परवानगी घ्यावी. परवानगीनंतरच त्यांना सोशल मीडियावर प्रचार करता येईल. सोशल मीडियावरील प्रचार थांबवण्याचे आदेश दिले आहेत. यानंतरही त्यांनी व्हिडीओ हटवले नाही तर उमेदवाराच्या माध्यम प्रतिनिधींवर कठोर कारवाई करण्यात येईल.
- बाबासाहेब पारधे, निवडणूक निर्णय अधिकारी (दिंडोरी)