नाशिक निवडणूक निकाल : मध्य मतदारसंघात चालल्या सर्वाधिक ‘नोटा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 07:37 PM2019-10-24T19:37:53+5:302019-10-24T19:38:38+5:30
Nashik Vidhansabha Election 2019भागातील २ हजार ४९३ मतदारांनी मात्र ‘ईव्हीएम’वर झळकलेल्या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांपासून अपक्षांपर्यंत सर्वांनाच नाकारले. या मतदारसंघात सर्वाधिक ‘नोटा’चा वापर झाल्याचे दिसून येते.
नाशिक : मध्य मतदार संघ हा शहराचा मध्यवर्ती व गावठाण भाग असलेला मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात जुन्या नाशकातील ‘दुबई वॉर्ड’पासून तर वडाळागावपर्यंत अन् रविवारकारंजापासून इंदिरानगरपर्यंतचा भाग समाविष्ट आहे. एकूणच सुशिक्षित मतदारांपासून अशिक्षित मतदारांचेही प्रमाण या भागात अधिक आहे. येथील मतदारांनी संपुर्णपणे भाजपच्या उमेदवार विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांना पुन्हा एकदा मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी दिली असली तरीदेखील या भागातील २ हजार ४९३ मतदारांनी मात्र ‘ईव्हीएम’वर झळकलेल्या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांपासून अपक्षांपर्यंत सर्वांनाच नाकारले. या मतदारसंघात सर्वाधिक ‘नोटा’चा वापर झाल्याचे दिसून येते.
शहरात सर्वाधिक कमी केवळ ४८ टक्के इतके मतदान या मतदारसंघात झाले होते. त्यामधून फरांदे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली तर प्रतिस्पर्धी कॉँग्रेसच्या उमेदवार हेमलता पाटील यांना ४५ हचार ६२ मते पडली. एकेकाळी हा मतदारसंघ कॉँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्यामुळे अजूनही कॉँग्रेसला कौल देणारी जनता मतदारसंघात असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. त्याचप्रमाणे २००९ साली या मतदारसंघात पहिल्यांदा परिवर्तन पहावयास मिळाले. तेव्हा राज ठाकरे यांच्या लाटेवर स्वार होऊन वसंत गीते हे येथून निवडून आले होते. त्यानंतर मात्र मनसेला या मतदारसंघात पुन्हा वर्चस्व निर्माण करता आले नाही. यंदाच्या निवडणूकीत मनसेकडून उमेदवारी करणारे नितीन भोसले यांना केवळ २२ हजार १४० मते मिळू शकली. त्या तुलनेत कॉँग्रेसने दुसरे क्रमांक राखण्यास यश मिळविले.
देवळाली मतदारसंघात यावर्षी मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडून आले. शिवसेनेचा बालेकिल्ला राष्टÑवादीच्या सरोज अहिरे यांनी काबीज केला. मात्र या मतदारसंघातदेखील १ हजार २४१ मतदारांनी निवडणूक रिंगणातील डझनभर उमेदवारांपैकी कोणालाही पसंती न देता थेट ‘नोटा’ची निवड केली.