नाशिकमध्ये हॉटेलचे अतिक्रमित बांधकामे पाडले
By श्याम बागुल | Published: September 6, 2018 03:41 PM2018-09-06T15:41:31+5:302018-09-06T15:42:56+5:30
सातपूर विभागातील हॉटेल नालंदा येथील १८ बाय ३० मीटर चे शेडचे बांधकाम, हॉटेल अन्नपूर्णा यांचे साडेतीन बाय सहा मीटरचे शेडचे बांधकाम तसेच सायंतारा बिल्डिंग सावरकरनगर येथील कब्जेदार नरेंद्र कोठावळे यांचे तीन बाय नऊ मीटरचे शेडचे बांधकाम महापालिकेमार्फत हटविण्यात आले.
नाशिक : सातपूर विभागातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेने हातोडा फिरविण्यास सुरुवात केली असून, नालंदा हॉटेल व अन्नपूर्णा हॉटेलचे सामासिक अंतरातील अनधिकृत शेडचे बांधकाम पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले. त्यामुळे अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहे.
सातपूर विभागातील हॉटेल नालंदा येथील १८ बाय ३० मीटर चे शेडचे बांधकाम, हॉटेल अन्नपूर्णा यांचे साडेतीन बाय सहा मीटरचे शेडचे बांधकाम तसेच सायंतारा बिल्डिंग सावरकरनगर येथील कब्जेदार नरेंद्र कोठावळे यांचे तीन बाय नऊ मीटरचे शेडचे बांधकाम महापालिकेमार्फत हटविण्यात आले. सातपूरच्या विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड, अतिक्रमण विभागाचे अधीक्षक महेंद्रकुमार पगारे, नगर नियोजन विभागाचे अभियंता नांदुर्डीकर यांच्यासह अतिक्रमण विभागाची दोन पथक एक जेसीबीसह पोलीस बंदोबस्तात अतिक्रमित बांधकामे काढण्यात आली. महापालिकेच्या सहाही विभागांमध्ये अशाप्रकारे ना फेरीवाला क्षेत्र, सार्वजनिक रस्ते, फूटपाथ चौक, याठिकाणी अतिक्रमणे करून व्यवसाय करणारे भाजीविक्रेते, फळविक्रेते, हॉकर्स, टपरीधारक व इतर तत्सम व्यावसायिक यांच्याविरुद्ध अशाच प्रकारची कडक कारवाई करून प्रसंगी पोलीस विभागात गुन्हे दाखल करण्यात येतील. तसेच शहरातील बेकायदेशीर बांधकामे करणाऱ्या तसेच पार्किंगच्या जागांवर असलेली बेकायदेशीर व अतिक्रमित बांधकामे काढून घेण्याबाबत यापूर्वी नागरिकांना वेळोवेळी जाहीर आवाहन करण्यात आल्याचे अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे सांगण्यात आले.