Nashik: कॉलेज रोड परिसरामध्ये दुसऱ्या दिवशीही अतिक्रमणे जमिनदोस्त
By Suyog.joshi | Updated: July 2, 2024 19:43 IST2024-07-02T19:42:25+5:302024-07-02T19:43:55+5:30
Nashik News: महानगरपालिकेच्यावतीने मंगळवारी (दि.२) सलग दुसऱ्या दिवशीही कॅनडा कॉर्नर ते कॉलेज रोड व गंगापूर रोड परिसरात अतिक्रमण मोहीम राबविण्यात येत अनधिकृत बांधकामांसह रस्त्यावरील शेड, अवैध पार्किंग यांना हटविण्यात आले.

Nashik: कॉलेज रोड परिसरामध्ये दुसऱ्या दिवशीही अतिक्रमणे जमिनदोस्त
- सुयोग जोशी
नाशिक - महानगरपालिकेच्यावतीने मंगळवारी (दि.२) सलग दुसऱ्या दिवशीही कॅनडा कॉर्नर ते कॉलेज रोड व गंगापूर रोड परिसरात अतिक्रमण मोहीम राबविण्यात येत अनधिकृत बांधकामांसह रस्त्यावरील शेड, अवैध पार्किंग यांना हटविण्यात आले. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांचे आदेशान्वये अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, अतिक्रमण उपायुक्त मयूर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कॅनडा कॉर्नर ते कॉलेज रोड परिसरात अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली. यामध्ये परिसरातील व्यवसायिकांनी सामासिक अंतर, रूफ टॉप, दुकानांसमोर उभारण्यात आलेले शेड, वाढीव बांधकाम, बाहेरील बाजूस बांधलेले कठडे, ओटे अतिक्रमण पथकाने उध्वस्त केले.
दुकानांसमोर अनधिकृतपणे लावलेले फलक काढून घेण्यात आले. रस्त्यावर थाटलेल्या अनधिकृत व्यावसायिकांचे सामान मनपाच्या अतिक्रमण मोहिमेत जप्त करण्यात आले. या मोहिमेत प्रामुख्याने हॉटेलच्या अनाधिकृत रूफ टॉप पाडण्यात आले. त्यात बिग बाजार समोरील लेन मध्ये पाटील प्लाझा अपार्टमेंट मधील स्काय फाईव्हज, गोदावरी सोसायटी येथील छोटे मिया, हवेली हँग आऊट, अल ओबिया, फ्लाईंग मंक, चार्ली डेक,बहूमल हॉटेल, एयर बार या सात अनधिकृत रूफ टॉप बांधकामावर कारवाई करण्यात आली. या हॉटेलचे रूफटॉप वर असलेले अनाधिकृत हॉटेल अतिक्रमण मोहिमेद्वारे उध्वस्त करण्यात आले. या अतिक्रमण मोहिमेत कार्यकारी अभियंता प्रशांत पगार, रवी बागुल, समीर रकटे, दत्तू शिंगाडे, उपायुक्त नितीन राजपूत विधी अधिकारी वणकर, विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र, सुनिता कुमावत, तुषार आहेर, अंबादास गरकळ यांच्यासह पोलीस विभागातील पोलीस उपायुक्त किरण चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ, पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, देशमुख यासह मनपा अतिक्रमण विभागातील अधिकारी कर्मचारी मोहिमेत सहभागी झाले होते. या प्रकारच्या अतिक्रमण मोहीम नाशिक मनपा हद्दीत पुढे ही अशीच सुरू राहणार आहे. नागरिकांनी व व्यावसायिकांनी आपले अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.