Nashik: उंटांच्या चर्चेवर पुर्णविराम; तपोभूमी नाशिकमधून १५२ उंट मूळ ‘मरुभूमी’कडे परतणार, जिल्हाधिकारी यांनी घेतला निर्णय
By अझहर शेख | Published: May 11, 2023 03:21 PM2023-05-11T15:21:05+5:302023-05-11T15:21:36+5:30
Nashik: नाशिक शहरासह जिल्ह्यात दाखल झालेल्या १५२ उंटांचा जत्था लवकरच मरुभूमी राजस्थानच्या दिशेने रवाना होणार आहे.
- अझहर शेख
नाशिक : शहरासह जिल्ह्यात दाखल झालेल्या १५२ उंटांचा जत्था लवकरच मरुभूमी राजस्थानच्या दिशेने रवाना होणार आहे. नाशिक जिल्हा प्रशासनाला या उंटांची सुरक्षित वाहतूक करण्यासाठी लागणारी मदत देण्याची तयारी धरमपूरस्थित श्रीमद राजचंद्र मिशन संस्थेने दर्शविल्याची माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. या सर्व उंटांचे पशुसंवर्धन विभागाद्वारे लसीकरण केल्यानंतर त्यांचा नाशिक ते राजस्थान व्हाया गुजरातमार्गे प्रवास सुरू होणार आहे.
आठवडाभरापासून नाशिकमध्ये अचानक दाखल झालेले शेकडो उंट चर्चेचा विषय बनला आहे. दिंडोरी, सटाणामार्गे तपोवनात दाखल झालेल्या १११पैकी तीन उंटांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या चुंचाळे येथील पांजरापोळमध्ये १०९ उंट तसेच मालेगावजवळील गोशाळेत ४३ उंट आश्रयास आहेत. या सर्व उंटांची मालकी कोणाची? हे अद्यापही जिल्हा प्रशासन किंवा पोलिस प्रशासनाकडून स्पष्ट केले गेलेले नाही. यामुळे उंटांचे मालक कोण? इतक्या मोठ्या संख्येने त्यांना नाशिकपर्यंत का धाडले गेले? हे प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात दाखल झालेल्या सर्व उंटांचे पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण केले जाणार आहे. यानंतर सर्वांना टॅगिंग करून त्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे घेतली जाईल, यानंतर उंटांचा राजस्थानच्या दिशेने प्रवास सुरू होईल, असे नाशिकचे तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांनी सांगितले. उंटांचा हा जत्था सध्या मालेगावजवळील एका गोशाळेत व नाशिक शहरातील चुंचाळे गावातील पांजरापोळमध्ये पाहुणचार घेत आहेत.
राजस्थानची संस्था पुरविणार ‘रायका’
धरमपूरस्थित श्रीमद राजचंद्र मिशन या संस्थेने नाशिकमधून उंटांना सुरक्षितपणे राजस्थानपर्यंत पोहोचविण्याची तयारी दर्शविली आहे. राजस्थानस्थित उंटांचे पालनपोषण करणाऱ्या संस्थेपर्यंत हे सर्व उंट पोहोच केले जाणार आहेत. यासाठी राजस्थानची संस्था उंटांची पायी वाहतूक करण्यात पटाईत असलेले काही जाणकार लोक (रायका) राजचंद्र मिशन संस्थेला उपलब्ध करून देणार आहेत. हे लोक मिळाल्यानंतर ते आणि संस्थेचे पदाधिकारी नाशिकमध्ये दाखल होऊन जिल्हा प्रशासनाकडे कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून उंटांचा राजस्थानच्या दिशेने प्रवास सुरू करणार आहेत.
उंटांना दररोज पायी चालण्याची सवय
उंटांच्या सुदृढ आरोग्याच्या दृष्टीने त्यांना दररोज काही अंतरापर्यंत पायी चालविणे गरजेचे असते, असे तज्ज्ञ सांगतात. वाळवंटात उंटांना दररोज पायी चालण्याची सवयच असते, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. यामुळे त्यांना राजस्थानपर्यंत पोहोचविण्यासाठी पायी चालवून नेणे हाच पर्याय असल्याचे राजस्थानस्थित संस्था व राजचंद्र मिशन संस्थेकडून सांगण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
आठवडाभरात प्रवास होईल सुरू!
जिल्हा प्रशासनाकडून उंटांची ‘घरवापसी’ हा टास्क हाती घेण्यात आला आहे. लवकरात लवकर सर्व उंटांच्या लसीकरणाला सुरुवात केली जाणार आहे. उंटांना टॅगिंगदेखील यावेळी केले जाईल. यासंदर्भात गुरुवारी पशुसंवर्धन सहउपआयुक्तांसोबत चर्चा करणार असल्याचे तहसीलदार नरेशकुमार बहिरम म्हणाले.
...कोण आहेत ‘रायका’
रायका-रायबारी हा अर्ध-भटक्या राजस्थान, गुजरातमधील ग्रामीण भागातील समुदाय आहे. ज्याला राजस्थानमध्ये रायका, देवासी तसेच गुजरातमध्ये रायबारी या नावाने ओळखले जाते. हा समुदाय पिढ्यान्पिढ्या उंट, शेळी, मेंढी पालन करत आले आहेत. हे लोक पशुपालक आहेत जे वर्षभर आपल्या जनावरांसह फिरतात. हा समाज मुळात राजस्थान व गुजरातमध्ये आढळतो.