Independence Day: बासरीच्या नादमाधुर्याने कवी कुसुमाग्रजांचे स्मारक भारावते तेव्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 11:20 PM2024-08-16T23:20:17+5:302024-08-17T09:43:25+5:30

Flute program Guruvandana on Independence Day, नाशकात शंभरावर बासरीवादकांचे ‘गुरूवंदना’ कार्यक्रमातून सादरीकरण. स्वातंत्र्यदिनी कुसुमाग्रज स्मारकात संपन्न झाला बासरीचा सोहळा.

Nashik experiences melody of the flute in Guruvandana program by Anil Kute's flute academy on Independence day | Independence Day: बासरीच्या नादमाधुर्याने कवी कुसुमाग्रजांचे स्मारक भारावते तेव्हा

Independence Day: बासरीच्या नादमाधुर्याने कवी कुसुमाग्रजांचे स्मारक भारावते तेव्हा

नाशिक मंगल, मधुर आणि चैतन्यदायी…!!! अशा भावनांनी ओथंबलेल्या प्रतिक्रिया रसिक श्रोत्यांकडून उमटत असतानाच, ज्याची सर्वांना प्रतीक्षा होती तो क्षण अखेर आलाच, तो म्हणजे ७ ते ७० वर्षांच्या बासरीवादकांनी (Flute playing) एकाच वेळी सादर केलेल्या  ‘वंदे मातरम्’ या गीताचा. निमित्त होते बासरीवादक अनिल कुटे संचालित बासरी वर्गाने नाशिककरांसाठी सादर केलेल्या ‘गुरुवंदना’ कार्यक्रमाचे.  दिनांक १५ ऑगस्ट, स्वातंत्र्यदिनी (15th August, Independence Day)  कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा हॉलमध्ये हा सुमधुर कार्यक्रम संपन्न झाला.

सर्व वयोगटातील शंभराहून अधिक बासरीवादकांनी ‘गुरुवंदना’ कार्यक्रमाच्या माध्यमातून आपली बासरीवादनाची कला रसिकांसमोर सादर करत त्यांना  मंत्रमुग्ध केले. यावेळी देशभक्तीपर संगीत, विविध रागांचे सादरीकरण, भक्ती संगीत, भजन, सिनेगीत अशी संगीताची मांदियाळीच बासरीच्या मधुर स्वरांमधून प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली. गुरू अनिल कुटे आणि त्यांचे असंख्य शिष्य यांनी एकाच वेळी व्यासपीठावर सादर केलेले बासरीवादन कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले.

दुपारी ४ वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम रसिकांच्या वन्स मोअर आणि प्रेरणादायी टाळ्यांच्या गजरामुळे तब्बल पाच तास म्हणजेच रात्री ९ पर्यंत उत्तरोत्तर रंगत गेला.  ‘सूर निरागस हो.. या गणेशवंदनेने ‘गुरूवंदना’ कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर ‘यह देश है वीर जवानों का,.. ऐ मेरे वतन के लोगो, यासारख्या देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण झाले. भेटी लागी जीवा, बोले रे पपीहा, पिया बावरी, सत्यम शिवम सुंदरम् या सारख्या भजन आणि विविध रागांवर आधारित सिनेगीतांनी बासरीची रंगत आणखीच वाढविली.

कार्यक्रमाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा होता, तो म्हणजे विविध रागांचे शास्त्रशुद्ध सादरीकरण. यात  आलाप, बंदिश, ताना, मुरकी, खटका, मिंड, गमक अशा विविध शास्त्रीय अंगांसह राग भैरव, राग मेघ, राग चारुकेशी, राग देस, राग भिन्न षडज्, राग जोग, राग बिहाग, राग वृंदावनी सारंग, राग यमन असे एक से बढकर एक मधुर आणि वैशिष्ट्यपूर्ण राग  बासरीवादनातून सादर करण्यात आले. यावेळी तबल्यावर स्वराज पाटील, प्रज्योत आढाव, सिंथेसायझरवर यश येवले, विधान बैरागी आणि ऑक्टोपॅडवर सार्थक बीडकर यांची साथ मिळाली

नाशिक शहरात आगामी काळात बासरीचे वैशिष्ट्यपूर्ण सोहळे आयोजित करून रसिकांना बासरीचा निखळ आनंद देण्याचा आणि त्या माध्यमातून नाशिकला ‘फ्लूट सिटी’चा नावलौकिक मिळवून देण्याचा मानस यावेळी श्री. कुटे यांच्या शिष्यवर्गाने बोलून दाखविला. दरम्यान कार्यक्रमासाठी चिन्मय चेतना मिशन आश्रमाचे स्वामी अद्वैतानंद, प्रसिद्ध तबला वादक नितीन पवार यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरयू जाधव यांनी केले. बळीराम महाले यांनी आभार प्रदर्शन केले.

Web Title: Nashik experiences melody of the flute in Guruvandana program by Anil Kute's flute academy on Independence day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.