...अन् होता होता थांबली मंगलाष्टकं; कट्टरवाद्यांच्या 'लव्ह जिहाद'च्या प्रचारामुळे लग्न सोहळा रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 04:02 PM2021-07-13T16:02:53+5:302021-07-13T16:04:21+5:30
सोशल मीडियावरील कट्टरवाद्यांच्या वाढत्या दबावामुळे कौटुंबिक विवाहसोहळा वधू पक्षाकडून रद्द
नाशिक: शहरातील एका हिंदू समाजाच्या दिव्यांग मुलीसोबत मुस्लीम युवकाने स्वखुशीने विवाह करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय वधु-वरांच्या उभय पक्षांना मान्य असल्याने लग्नपत्रिकाही तयार करण्यात आली. मात्र ही लग्नपत्रिका सोशल मीडियावरुन काही कट्टरवादी धर्मांध संघटनांनी व्हायरल करत प्रचंड दबाव वाढविला. यामुळे वधुपक्षाकडे समाजाच्या संघटनेकडूनही विचारणा झाली. अखेर वधुपित्याने लेखी देत हा विवाह रद्द करत असल्याचे संघटनेला कळविले आणि दोन्ही कुटुंबियांच्या आनंदावर विरजण पडले.
नाशिकमध्ये हिंदू समाजातील एका दिव्यांग मुलीसोबत शिकणाऱ्या मुस्लीम युवकाने लग्नासाठी स्वखुशीने तयारी दर्शविली. या तरुण-तरुणीचे कुटुंबदेखील एकमेकांच्या जुने परिचित आहेत. तरुणी दिव्यांग असल्याने तिला लग्नासाठी स्थळं येत नव्हती. तिच्यासोबत शिकणारा मुस्लीम युवक हे सर्व जाणून होता. त्याच्या संवेदनशील मनाने ही बाब हेरली आणि त्याने लग्नाचा मानस तरुणीच्या वडिलांकडे बोलून दाखविला. दोन्ही कुटुंबातील वडिलधारे एकत्र आले. त्यांची बैठक झाली आणि कोरोनाची साथ लक्षात घेता शासकीय नियमानुसार मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत शहरातील चांडकसर्कल परिसरातील एका हॉटेलमध्ये लग्नसोहळा करण्याचे ठरले. जवळच्या पाहुण्यांना लग्नपत्रिका सोशल मिडियाच्या माध्यमातून पाठविण्यात आली. दरम्यान, ही लग्नपत्रिका चांगलीच व्हायरल झाली अन् त्यावर लक्ष गेले काही धर्मांध कट्टरवादी संघटनांचे. एका समाजाच्या काही संघटनांनी या लग्नाला विरोध दर्शविला. दरम्यान, वधु किंवा वर पक्षाकडून यासंदर्भात कोणाविरुद्धही पोलीस किंवा अन्य कोणत्याही शासकीय यंत्रणेकडे अद्यापतरी तक्रार केलेली नाही.
‘लव्ह जिहाद’चा दिला रंग
वस्तुस्थिती समजून न घेता ‘लव्ह जिहाद’चा रंग देत राळ उठवली. परिणामी वधुपक्षाला त्यांच्या समाजाच्या संघटनेनेही विचारणा केली. दरम्यान, या दोन्ही कुटुंबियांचा लग्नाचा आनंद बाजूला पडला आणि मानसिक ताण-तणावाला त्यांना सामोरे जावे लागले. अखेर आपआपसांत त्यांनी चर्चा करत लग्नसोहळा रद्द करण्यात येत असल्याचा लेखी ‘निर्वाळा’ समाजाच्या संघटनेच्या अध्यक्षांकडे दिला.
वधुपित्याला धमकीचे फोन, मॅसेज
धर्मांध कट्टरवादी संघटनांकडून अज्ञात व्यक्तींनी वधुपित्याला चक्क धमक्यांचे फोन, मॅसेज करुनही दबाव वाढविला. यामुळे वधुपित्याच्या पायाखालची जमीन सरकली आणि अखेर त्यांनी थाटामाटात मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत वैदिक पध्दतीने होणारा कौटुंबिक विवाहसोहळा रद्द केल्याचे जाहीर करुन टाकले.
कोर्ट मॅरेज आटोपले
वधु-वरांच्या उभय पक्षांकडील नातेवाईकांच्या उपस्थितीत काही महिन्यांपुर्वीच या दोघांनी ‘कोर्ट मॅरेज’ आटोपले. कोरोनाची साथ सुरु असल्याने वधु-वरांच्या विवाहनोंदणी कार्यालयात जाऊन नोंदणी केली आणि वधु-वराच्या इच्छेप्रमाणे काेर्ट मॅरेज यापुर्वीच पार पडले असल्याचे वधुपक्षाकडून सांगण्यात आले आहे. मात्र या सर्व प्रकारामुळे प्रचंड मनस्ताप दोघा कुटुंबियांना सहन करावा लागल्याने संताप व्यक्त होत आहे.