अन्न व औषध प्रशासनाची दूध तपासणी मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 05:04 PM2018-01-24T17:04:20+5:302018-01-24T17:09:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : दूूध भेसळीसंदर्भात आलेल्या तक्रारी तसेच मागील काही दिवसांपासून दुधातील भेसळीचे प्रकार मोठ्या शहरात आढळून आल्यानंतर नाशिक विभागामध्येदेखील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने दूध तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.
ग्राहकांना सुरक्षित दूध उपलब्ध व्हावे, याकरिता अन्न व औषध प्रशासनाकडून नियमितपणे नाशिक विभागामध्ये दूध संकलन केंद्रे, दूध प्रक्रिया केंद्रे, वितरक, किरकोळ विक्रेते अशा सर्व स्तरावर दुधाचे नमुने घेण्याची कार्यवाही केली जाते. दुधाच्या भेसळीचे गांभीर्य लक्षात घेऊन दूध केंद्रे आणि प्रक्रिया केंद्रांना अचानक भेटी देऊन तपासणी करण्यात येत आहे.
दुधामधील भेसळीस आळा घालण्याच्या दृष्टीने नाशिक विभागामध्ये मागील आठवडाभर दुधाचे नमुने घेणेची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये दूध संकलन केंद्रे व दूधप्रक्रिया केंद्रे यांची तपासणी केली जात असून दुधाचे नमुने घेण्यात येत आहेत.
या मोहिमेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यात दूध उत्पादक असलेल्या तालुक्यांमध्ये विशेष लक्ष देण्यात आले आहे. विभागातील सर्व अन्नसुरक्षा अधिकाºयांनी एकाच दिवशी १७ ठिकाणांहून २९ दुधाचे नमुने तपासणीकरिता घेतले आहेत. ही मोहीम नाशिक विभागातर्फे सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात आली असून, विभागात १३१ दुधाचे नमुने घेण्यात आले आहेत. प्रयोगशाळेकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर अहवालाच्या अनुषंगाने संबंधितांविरुद्ध पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
नाशिक विभागामध्ये मागील वर्षी ३०२ दुधाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी ८४ नमुने कमी दर्जाचे घोषित झाले होते. एकाही नमुन्यात आरोग्यास हानिकारक अशी भेसळ आढळून आली नव्हती. गेल्या दोन वर्षांमध्ये कमी दर्जाच्या ७६ नमुन्या प्रकरणी रुपये १९,४८,००० इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
सहआयुक्त उदय वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त भूषण मोरे, अन्नसुरक्षा अधिकारी विवेक पाटील, किशोर बाविस्कर, सागर नेरकर, ओझरकर, भरत इंगळे यांनी मोहीम राबविली.