नाशिकमध्ये गणपती बाप्पा करतोय हेल्मेट वापरासंदर्भात जनजागृती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2017 03:31 PM2017-09-01T15:31:56+5:302017-09-01T15:39:48+5:30
रस्ते अपघात टाळण्यासाठी नाशिक पोलीस अनोखा उपक्रम राबवत आहेत. नागरिकांमध्ये हेल्मेट वापरासंबंधी जनजागृती व्हावी व रस्ते अपघात टळावेत, यासाठी गणरायाच्या वेशातील कार्यकर्त्यांनी घेऊन पोलीस फिरत आहेत व बाईकस्वारांना हेल्मेट वापराचे महत्त्व पटवून देत आहेत.
नाशिक, दि. 1 - रस्ते अपघात टाळण्यासाठी हेल्मेट वापरले पाहिजे, यासाठी नाशिकच्या पोलीस आयुक्तालयाच्या वतीने वेगवेगळया माध्यमातून प्रयोग केले जातात. कधी दुचाकीस्वाराला पकडल्यानंतर नवीन हेल्मेट खरेदी करुन आणून दाखवल्यावर गाडी परत दिली जाते. तर कधी हेल्मेटची गरज का? या विषयावर निबंध लिहायला सांगून त्यानंतरच गाडी परत केली जाते. असे निरनिराळे फंडे राबवून हेल्मेट वापराबाबत जनजागृती केली जात आहे.
आता गणेशोत्सव सुरू असल्याने नाशिक पोलिसांनी हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यासाठी थेट गणपती बाप्पालाच प्रबोधनासाठी बोलावले आहे. म्हणजे गणरायाच्या वेशातील कार्यकर्त्यांना घेऊन पोलीस फिरत आहेत आणि हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांना हा बाप्पा स्वतः हेल्मेट घालत आहेत किंवा त्याचे महत्त्व पटवून देत आहे. दुचाकीस्वार जो पर्यंत हेल्मेट घालण्याचा शब्द देत नाही तो पर्यंत गणराय त्या दुचाकीस्वाराची सुटका करत नाही. शुक्रवारी दिवसभर शहराच्या विविध भागात सुरू असलेला उपक्रम चर्चेचा ठरला.