नाशकातील गॅस सिलिंडर स्फोटातील मृतांचा आकडा सहावर; पुन्हा एका युवकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 12:19 PM2021-04-10T12:19:13+5:302021-04-10T12:19:40+5:30
Nashik gas cylinder blast : वडाळानाका भागातील संजरीनगर इमारतीत आठवडाभरापूर्वी रात्रीच्या सुमारास अचानकपणे घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला होता. या दुर्घटनेत घरातील आठ लोक जखमी झाले होते.
नाशिक - वडाळानाका भागातील संजरीनगर इमारतीत आठवडाभरापूर्वी रात्रीच्या सुमारास अचानकपणे घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला होता. या दुर्घटनेत घरातील आठ लोक जखमी झाले होते.जखमींपैकी शुक्रवारी मध्यरात्री चौथ्या युवकाचा मृत्यु झाला. या दुर्घटनेत मृतांचा आकडा आता सहावर पोहचला आहे. रमजान वलीउल्ला अन्सारी(22) असे उपचारादरम्यान मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.
गेल्या शुक्रवारी रात्री घरगुती गॅस सिलिंडर बदलताना गळती होऊन स्फोट झाल्याची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत सैय्यद कुटुंबातील चौघांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला होता. यामध्ये दोन महिला व दोघा सख्ख्या भावांचा समावेश आहे. तसेच अन्सारी कुटुंबातील शोएब वलीउल्ला अन्सारी (28) याचाही मृत्यु झाला.त्यापाठोपाठ त्याचा सख्खा भाऊ रमजानचीही प्राणज्योत खासगी रुग्णालयात मालवली. या दोन्ही कुटुंबियांवर आभाळ फाटले आहे. घरातील कर्ते तरुण मुले नियतीने कायमची हिरावून नेली आहे. नाशिक शहरात अशाप्रकारे दुर्घटनेत सहा बळी जाण्याची ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
या दुर्घटनेत नसरीन नुसरद सय्यद (२५) आणि सईदा शरफोद्दीन सय्यद ( ४९) या नणंद-भावजयी पहिल्यांदा रुग्णालयात उपचार घेताना मृत्युमुखी पडल्या होत्या.