ठाणे वर्षा मॅरेथॉनवर पुन्हा नाशिकच्या कन्यांचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 02:17 AM2019-08-19T02:17:50+5:302019-08-19T02:20:06+5:30
ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत नाशिकच्या मुलींनी सलग अकराव्या वर्षी बाजी मारत पुन्हा नवीन दशकातही वर्चस्व कायम राखण्याचे संकेत दिले. २१ किलोमीटरच्या अर्धमॅरेथॉन गटात नाशिकच्या आरती पाटीलने, तर दहा किलोमीटर गटात कोमल जगदाळे हिने अव्वलस्थान पटकावत ठाणे मॅरेथॉनवर पुन्हा नाशिकचा झेंडा फडकावला.
नाशिक : ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत नाशिकच्या मुलींनी सलग अकराव्या वर्षी बाजी मारत पुन्हा नवीन दशकातही वर्चस्व कायम राखण्याचे संकेत दिले. २१ किलोमीटरच्या अर्धमॅरेथॉन गटात नाशिकच्या आरती पाटीलने, तर दहा किलोमीटर गटात कोमल जगदाळे हिने अव्वलस्थान पटकावत ठाणे मॅरेथॉनवर पुन्हा नाशिकचा झेंडा फडकावला.
नाशिकच्या आरतीने २१ किलोमीटरचे हे अंतर १ तास २७ मिनिटे आणि ४७ सेकंदांत पूर्ण केले. आरतीने प्रारंभापासून घेतलेली आघाडी अखेरपर्यंत कायम राखत मोठ्या अंतरासह महिलांच्या अर्धमॅरेथॉनचे विजेतेपद पटकावले. द्वितीय स्थानी आलेल्या प्राजक्ता गोडबोलेने १ तास २८ मिनिटे २५ सेकंदांची वेळ दिली होती, तर कोमलने १० किलोमीटरची शर्यत ३७ मिनिटे ५५ सेकंदांत पूर्ण केली, तर नागपूरच्या निकिता राऊतने द्वितीय क्रमांक पटकावतांना ३८ मिनिटे ३२ सेकंद अशी वेळ दिली.
भोसलाची ११व्यांदा बाजी
अर्धमॅरेथॉनमध्ये बाजी मारणारी आरती ही नाशिकच्या भोसला सैनिकी स्कूलची विद्यार्थिनी असून, विजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ती सराव करते. सर्वप्रथम २००७ साली नाशिकच्या कविता राऊतने ठाणे वर्षा मॅरेथॉन जिंकत या मॅरेथॉनवरील नाशिकच्या वर्चस्वाला प्रारंभ केला होता. त्यानंतर कविताने सलग चार वर्षे ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर मोनिका आथरे, नंतर संजीवनी जाधव, पूनम सोनवणे आणि यंदा आरती पाटीलने बाजी मारत ११व्यांदा ही शर्यत जिंकून नाशिकचे ठाणे मॅरेथॉनवरील वर्चस्व कायम राखले आहे. केवळ गतवर्षी याच काळात विद्यापीठाची स्पर्धा असल्याने नाशिकच्या महिला धावपटू ठाणे मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्या नव्हत्या.