नाशिकच्या मुलींना उपविजेतेपद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:19 AM2021-09-07T04:19:18+5:302021-09-07T04:19:18+5:30
नाशिक : महाराष्ट्र कुमार व मुली गट अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत नाशिकच्या मुलींच्या संघाला अंतिम सामन्यात उस्मानाबाद संघाकडून निसटता पराभव ...
नाशिक : महाराष्ट्र कुमार व मुली गट अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत नाशिकच्या मुलींच्या संघाला अंतिम सामन्यात उस्मानाबाद संघाकडून निसटता पराभव पत्करावा लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. साडेचार दशकांहून अधिक काळाच्या इतिहासात नाशिकच्या मुलींचा संघ प्रथमच फायनलपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरला आहे.
नगर जिल्ह्यातील शेवगाव येथे सुरू असलेल्या ४७ व्या महाराष्ट्र कुमार व मुली गट अजिंक्यपद खो-खो स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात नाशिकने गतवर्षीच्या उपविजेत्या पुणे संघावर २ गडी आणि २.५० सेकंदांचा वेळ राखून मात करीत स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली; मात्र अंतिम सामन्यात नाशिकला ती विजयी लय कायम राखता आली नाही. नाशिक विरुद्ध उस्मानाबाद या दोन संघातील मुलींचा अंतिम सामना मध्यांतराला ७ विरुध्द ७ अशा समान गुण संख्येवर होता. नाशिकने आपल्या पहिल्या आक्रमणात उस्मानाबाद संघाचे सात गडी बाद केले. नाशिकच्या वृषाली भोयेने धारधार आक्रमण करत ४ गडी बाद केले. तिला कौसल्या पवार १ गडी, ऋतुजा सहारे, मनीषा पडेर यांनी प्रत्येकी १ गडी बाद करीत साथ दिली. नाशिककडून संरक्षण करताना सरिता दिवाने २.५० सेकंद, कौसल्या पवार व ऋतुजा सहारे यांनी प्रत्येकी १.४५ तर निशा वैजल नाबाद १.२०मिनिट संरक्षण केले. त्यांना उस्मानाबादचे चारच गडी बाद करता आले. त्यामुळे उस्मानाबाद संघाने पाच गडी बाद करण्याचे आव्हान पूर्ण करीत अंतिम सामना १२ विरुद्ध ११असा १ गुण व तीन मिनिट राखून जिंकला. नाशिकच्या या कामगिरीबद्दल संघटनेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी मुलींचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
इन्फो
वृषाली भोये ठरली सर्वोत्कृष्ट आक्रमक
नाशिकची वृषाली भोये ही स्पर्धेतील सर्वोकृष्ट आक्रमक ठरली. तिला ५००० रुपये चषक व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.सामन्याच्या शेवटच्या डावात चार मिनिटे आक्रमण झाल्यानंतर नाशिकची कर्णधार कौसल्या पवार ही खुंट्यावर धडकल्याने जायबंदी झाली. त्यामुळे नाशिकच्या मुलींचे लक्ष विचलित झाल्यानेच विजेतेपद हुकले.
इन्फो
शिस्तबद्ध प्रयत्नांचे फळ
नाशिकचे खो-खो संघटक मंदार देशमुख यांनी ४ वर्षांपूर्वी जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, कुळवाडी, तोरंगण येथील आदिवासी पाड्यांवरून निवडलेल्या १५ मुलींची नाशिकमध्ये राहण्याची तसेच शिक्षणाची सोय करीत त्यांचे पालकत्व स्वीकारले. त्यांना खो-खोचे प्रशिक्षण देत त्यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरी होण्यासाठी प्रशिक्षक गीतांजली सावळे-देशमुख आणि प्रशिक्षक उमेश आटवणे यांच्यासमवेत छत्रपती शिवाजी स्टेडियमवर प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यामुळेच उपविजेतेपदापर्यंत यश शक्य झाल्याची भावना जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी व्यक्त केली.
फोटो
०६भोये, ०५ खो-खो