ऑक्सिजन रेल्वेद्वारे नाशिकला, मिळाला २८ टन ऑक्सिजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:14 AM2021-04-25T04:14:21+5:302021-04-25T04:14:21+5:30
नाशिकरोड, प्रतिनिधी ऑक्सिजनसाठी आतुरतेने वाट पाहणाऱ्या नाशिककरांना शनिवारी मोठा दिलासा मिळाला. विशाखापट्टणमहून ऑक्सिजनचे टॅँकर घेऊन आलेली देशातील पहिली ऑक्सिजन ...
नाशिकरोड, प्रतिनिधी
ऑक्सिजनसाठी आतुरतेने वाट पाहणाऱ्या नाशिककरांना शनिवारी मोठा दिलासा मिळाला. विशाखापट्टणमहून ऑक्सिजनचे टॅँकर घेऊन आलेली देशातील पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस नाशिकरोड मालधक्का येथे दाखल झाली. या रेल्वेव्दारे ४ टँकर नाशिकरोडला उतरवून घेतल्यानंतर त्यातील दोन टँकर नाशिकला तर दोन टँकर नगरला रवाना करण्यात आले.
अशाप्रकारे प्रथमच ऑक्सिजन ट्रेन येणार असल्याने नाशिकरोड स्थानकावर शुक्रवारपासूनच तयारी करण्यात आली होती. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यवस्थेची पाहणी केली होती. तर शनिवारी टँकर दाखल झाल्यानंतर खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते हार घालून पहिला टँकर नाशिक शहरात रवाना करण्यात आला. नाशिकची ऑक्सिजन गरज सुमारे शंभर ते सव्वाशे टनची आहे. मात्र, नाशिकला सध्या केवळ ८७ मेट्रिक टन ऑक्सिजन मिळत असल्याने दररोज मोठा तुटवडा जाणवत आहे. रेल्वेव्दारे प्रथमच रोल ऑन रोल पद्धतीने ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. हा साठा लगेच वापरला जाणार नाही. त्यामुळे हा साठा विल्होळीच्या ऑक्सिजन प्रकल्पात साठवून ठेवण्यासाठी पाठविण्यात आला. गाडी आल्यानंतर प्रत्येक टॅँकर हवा भरून प्रवासाकरीता तयार होण्यासाठी अर्धा तास लागत होता. नवी मुंबईच्या कळंबोली रेल्वे स्थानकातून १८ एप्रिलला ऑक्सिजन एक्स्प्रेस विशाखापट्टणमला गेली. तिथून ऑक्सिजन भरून ४० तासांचा प्रवास करून ती शनिवारी सकाळी नाशिकरोडला पोहोचल्यावर तिचे जोरदार स्वागत करण्यात आले.
कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून ऑक्सिजन ट्रेनच्या आगमनावेळी विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी होते. अन्न व औषध प्रशानाच्या सहाय्यक आयुक्त माधुरी पवार, सुरेश देशमुख, रेल्वेचे स्टेशन मास्तर, वरिष्ठ वाणिज्य अधिकारी आर. के. कुठार, कुंदन महापात्रा, आरपीफचे वरिष्ठ निरीक्षक एन. के. गुहिलोत, नाशिकरोड पोलीस ठाण्याचे सूरज बिजली, अग्निशमन दलाचे अनिल जाधव,आरटीओचे अधिकारी वासुदेव भगत, रेल्वे विद्युत अभियंता प्रवीण पाटील, माथाडी विभागाचे भारत निकम, रामबाबा पठारे आदी हजर होते. याशिवाय रेल्वे पोलीस, जिल्हाधिकारी कार्यालय, माथाडीचे शहर वाहतूकचे प्रतिनिधी होते. रुग्णवाहिका टँकरमध्ये हवा भरण्यासाठी तसेच जनरेटर व्हॅन, अग्निशमन बंब हजर होते.
इन्फो
मिळाला अपेक्षेपेक्षा निम्मा
विशाखपट्टणमहून ऑक्सिजनचे सात टँकर घेऊन ही एक्सप्रेस निघाली. नागपूरला तीन टँकर उतरविल्यानंतर नाशिकरोड मालधक्का येथे सकाळी अकरा वाजता ही गाडी आली. चारपैकी दोन टॅँकर नाशिक व दोन नगर जिल्ह्यासाठी होते. दोन्ही जिल्ह्यांना प्रत्येकी पन्नास मेट्रिक टन ऑक्सिजन मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, कागदपत्रे हातात पडल्यावर प्रत्यक्षात एकूण मिळून ५२ टन ऑक्सिजन आल्याचे स्पष्ट झाले. पैकी २८.४ टन नाशिकला तर २४.५ मेट्रिक टन नगरला वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. नाशिकच्या कोट्यातून धुळे, ग्रामीण नाशिक तसेच राखीव व नाशिक शहर असे नियोजन करण्यात आले आहे.
इन्फो
अल्पसा दिलासा
ऑक्सिजन ट्रेनमुळे नाशिककरांच्या वाट्याला पुरेसा ऑक्सिजन मिळून कोरोना रुग्णांना दिलासा मिळणार आहे. शहरातील काही खासगी रुग्णालयातील ऑक्सिजन साठा संपण्याच्या मार्गावर असताना विशाखापट्टणम येथून येणाऱ्या ऑक्सिजन ट्रेनमुळे आरोग्य यंत्रणेवर आलेला ताण कमी होण्यास मदत होणार आहे. नाशिकमध्ये ऑक्सिजनचा मोठा तुटवडा आहे. अनेक रुग्णालयातून रुग्ण इतरत्र हलविण्यात आले आहेत. मागणीपेक्षा पुरवठा कमी होत असल्यामुळे तुटवडा भरून काढणे प्रशासनाला अवघड झाले आहे. या विशेष ट्रेनमुळे प्रशासनालादेखील अल्पसा दिलासा मिळाला आहे.
कोट
अधिक ऑक्सिजन ट्रेनसाठी पाठपुरावा
खासदार हेमंत गोडसे यावेळी हजर होते. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, शासकीय रुग्णालयांमध्ये जागा नसल्याने त्यांना खासगी रुग्णालयांमध्ये पाठविले जाते. त्यामुळे रेल्वेने आलेल्या ऑक्सिजनचे वाटप करताना खासगीचाही विचार करावा. रुग्णसंख्येनुसार हे वाटप केले जावे. महाराष्ट्राला पुरेसा ऑक्सिजन मिळावा, आणखी ऑक्सिजन ट्रेन मिळावी यासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला जाईल. सर्वच राज्यांमध्ये ऑक्सिजनची तीव्र टंचाई असल्याने केंद्राने चोख वितरण व्यवस्था करावी अशी मागणीदेखील गोडसे यांनी केली. ऑक्सिजनचे हे टँकर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शहरात गरजेच्या ठिकाणी वितरीत केले जाणार आहेत. विशाखपट्टणमहून ऑक्सिजन रेल्वे येण्यास ४० तास लागतात. एवढा विलंब परवडणारा नाही. रेल्वेची विशेष टँकर असलेली मालगाडी यासाठी वापरल्यास मोठ्या प्रमाणात आणि कमी वेळेत ऑक्सिजन उपलब्ध होईल असेही गोडसे म्हणाले.