नाशिक एचएएललादेखील मिळणार तेजस विमाननिर्मितीचे काम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:12 AM2021-01-15T04:12:48+5:302021-01-15T04:12:48+5:30
नाशिक : भारतीय वायुदलाच्या ताफ्यात ८३ तेजस विमाने येणार असून या विमानांपैकी काहींची निर्मिती नाशिकची 'हिन्दुस्तान ॲरोनॉटिक्स लिमिटेड' ...
नाशिक : भारतीय वायुदलाच्या ताफ्यात ८३ तेजस विमाने येणार असून या विमानांपैकी काहींची निर्मिती नाशिकची 'हिन्दुस्तान ॲरोनॉटिक्स लिमिटेड' (एचएएल) कंपनी करणार आहे. पुढील सात वर्षे या विमाननिर्मितीला लागणार असल्याने या नवीन दशकात तरी नाशिक एचएएलला कामांची चिंता भेडसावणार नाही.
या विमानांच्या निर्मितीतील प्रमुख भाग नाशिक आणि बेंगळुरू एचएएल यांच्यात विभागले जाणार असल्याने ४८ हजार कोटींच्या कामापैकी एक चतुर्थांश हिस्सा जरी नाशिकला मिळाला तरी नाशिक एचएएलला पुन्हा ऊर्जितावस्था मिळण्यास मदत होऊ शकणार आहे. सेकंड लाइन मॅन्युफॅक्चरिंग सेटअपची ही विमाने हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर क्षेपणास्राचा अचूक मारा करण्यास सक्षम आहेत. तेजस विमान अत्यंत हलके असल्याने अत्यंत चपळाईने ते हवेत झेपावू शकते. तसेच हवेतल्या हवेत इंधन भरण्याची सुविधा त्यामध्ये आहे. तेजस हे अष्टपैलू प्रकारातील विमान असल्याने लष्करीदृष्ट्यादेखील हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. त्यामुळे लढाऊ तेजस विमानाचा समावेश झाल्यानंतर भारतीय वायुदलाच्या क्षमतेत आणखी वाढ होणार आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाचे डिफेन्स इनोव्हेशन हब नाशिकमध्ये होणार असून, यासंबंधीची घोषणा तत्कालीन संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांनी तीन वर्षांपूर्वी केली होती. स्थानिक उद्योग जगतासाठी ही महत्त्वाची घडामोड असून, स्थानिक रोजगारालादेखील चालना मिळू शकणार आहे.