Nashik: 'मी कोपऱ्यातही गेलो नाही अन् कानातही बोललो नाही', मनोज जरांगे-पाटील यांनी स्पष्टच सांगितले
By Suyog.joshi | Published: October 9, 2023 11:18 AM2023-10-09T11:18:53+5:302023-10-09T11:21:03+5:30
Nashik: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मी मरेपर्यंत हटणार नाही. आरक्षण मिळेपर्यंत ही लढाई कायम राहील. आरक्षणाचा आनंद चेहऱ्यावर पाहिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. हे आंदोलन शांततेत होईल.
- सुयोग जोशी
नाशिक - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मी मरेपर्यंत हटणार नाही. आरक्षण मिळेपर्यंत ही लढाई कायम राहील. आरक्षणाचा आनंद चेहऱ्यावर पाहिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. हे आंदोलन शांततेत होईल. आरक्षणासाठी ही पहिली आणि शेवटची लढाई आहे. आरक्षणासाठी राज्य शासनाशी बोलायला मी कोपऱ्यातही गेलो नाही अन् कानातही बोललो नाही असे प्रतिपादन मनोज जरांगे-पाटील यांनी रविवारी येथे केले. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर निघालेले मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी (दि.८) रात्री उशिरा शहरातील सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे सकल मराठा समाजातर्फे सुरू असलेल्या साखळी उपोषणाला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
जरांगे पाटील यांचे टाळ-मृदंगाच्या गजरात स्वागत करण्यात आले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जरांगे पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या हस्ते मशाल पेटविण्यात आली. प्रास्ताविक राम खुर्दळ यांनी केले. गेल्या २५ दिवसांपासून साखळी उपोषणास बसलेल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचा जरांगे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सुनील बागुल, हरिभाऊ शेवाळे, संजय चव्हाण, संदीप बर्वे, नाना बच्छाव, योगेश नारकर उपस्थित होते.
समाज बांधवांचा उत्साह
रात्री उशिरापर्यंत समाजातील बांधव, महिला तसेच बालक जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते, यावेळी एक मराठा लाख मराठा, कोण म्हणतं देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, मी मराठा मी कुणबी अशा घोषणा दिल्या.
१४ तारखेला उपस्थित राहावे
मराठा समाजाकडून यापूर्वी एक मराठा अशी घोषणा दिली जात होती. त्याच्यासोबत आता जरांगे पाटील यांच्यासाठी एक मराठा ग्रेट मराठा अशी घोषणा देण्यात आली. दरम्यान, १४ ऑक्टोबरला अंतरवाली सराटीत सभेला आपल्या कुटुंबास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले.
नोकरीसाठी हवे आरक्षण
जरांगे पाटील म्हणाले 'मराठा आरक्षणाची लढाई २९ ऑगस्टला अंतरवेलीत सुरू झाली. तिसऱ्या दिवशी महिलांवर हल्ला. त्यांची डोके फोडण्यात आली. ज्या देशात लोकशाही, कायद्याला मानले जाते तेथे आपल्याला कुणी मारहाण करेल असा विचारही कोण्या माउलीने केला नव्हता. मराठा समाजाचे नेमके काय चुकले की, असा प्राणघातक हल्ला करण्यात आला. हा हल्ला संपूर्ण मराठा समाजावर होता. नाशिकने या आंदोलनाला वेगळी दिशा दिली आहे. आम्हाला धिंगाणा महामार्गावरही करता आला असता. मला खुर्चीचा मोह नाही. नोकरीसाठी आम्हाला आरक्षण हवे आहे. आम्ही आमचा हक्क मागत आहोत असल्याचे पाटील यांनी सांगितले.