महाबळेश्वरपेक्षा नाशिक जास्त ‘कुल सिटी’; २४ तासांत पारा थेट ९.८ अंशावर

By अझहर शेख | Published: January 16, 2024 04:14 PM2024-01-16T16:14:05+5:302024-01-16T16:14:48+5:30

भारतीय हवामान खात्याकडून या आठवड्यात राज्यात थंडीची तीव्रता वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

Nashik is more cooler city than Mahabaleshwar; Mercury directly at 9.8 degrees in 24 hours | महाबळेश्वरपेक्षा नाशिक जास्त ‘कुल सिटी’; २४ तासांत पारा थेट ९.८ अंशावर

महाबळेश्वरपेक्षा नाशिक जास्त ‘कुल सिटी’; २४ तासांत पारा थेट ९.८ अंशावर

नाशिक : शीत लहरींचा वेग वाढल्यामुळे उत्तर महाराष्ट्र गारठला असून नाशिक, जळगाव या जिल्ह्यांत थंडीचा कडाका वाढला आहे. महाबळेश्वरपेक्षा नाशिक हे सर्वाधिक ‘कुल सिटी’ असल्याचा अनुभव सध्या नाशिककरांना दोन दिवसांपासून येत आहे. गेल्या २४ तासांत किमान तापमान मंगळवारी (दि.१६) सकाळी थेट ९.८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले. या हंगामातील ही सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली.

भारतीय हवामान खात्याकडून या आठवड्यात राज्यात थंडीची तीव्रता वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यानुसार रविवारी रात्रीपासूनच थंडी नागरिकांना जाणवू लागली होती. रात्री थंड वारे वेगाने वाहू लागल्याने सोमवारी किमान तापमान थेट ११.१ अंश तर मंगळवारी यापेक्षाही खाली तापमान आले. या हंगामात पहिल्यांदाच किमान तापमान दहा अंशांपेक्षा कमी नोंदविले गेले. थंडीचा कडाका वाढताच नागरिकांकडून पुन्हा उबदार कपड्यांच्या वापरावर भर दिला जाऊ लागला आहे, तसेच सकाळी व संध्याकाळी गोदाकाठावर व शहराजवळच्या खेड्यांत, तसेच शहरी भागातील गावठाण परिसरातही शेकोट्यांचा आधार रहिवासी घेतानाचे चित्र पाहावयास मिळत आहे.

महाबळेश्वरचे किमान तापमान १४.७ अंश इतके नोंदविले गेले असून त्या तुलनेत नाशिकचा पारा खूपच खाली घसरला आहे. यामुळे उबदार कपड्यांना आता शहरात पुन्हा मागणी वाढू लागली आहे. आठवडाभरापूर्वी थंडी पूर्ण गायब झाल्याचा अनुभव नागरिक घेत होते. आता मात्र थंडी चांगलीच जाणवू लागली आहे. या हंगामात डिसेंबरपासून आतापर्यंत थंडीचा फारसा कडाका नाशिककरांना जाणवला नव्हता. आठवडाभरापूर्वी ढगाळ हवामानासह किमान तापमानही १७.७ अंशांपर्यंत वाढलेले होते. या आठवड्यापासून वातावरणाच्या स्थितीमध्ये अचानक वेगाने बदल होत असून, किमान तापमानाचा पारा घसरू लागला आहे. कमाल तापमानातही ३ अंशांनी घसरण झाली आहे.

मागील पाच दिवसांचे किमान तापमान असे...(अंश सेल्सिअसमध्ये)
१२ जानेवारी- १७.४
१३ जानेवारी- १५.७

१४ जानेवारी- १५.४
१५ जानेवारी- ११.१

१६ जानेवारी- ९.८

Web Title: Nashik is more cooler city than Mahabaleshwar; Mercury directly at 9.8 degrees in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक