नाशिक सकल जैन समाजासाठी ‘ती’ पर्वणीच... : मुनिश्री तरुणसागरजींचा मोठा सहवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 06:18 PM2018-09-01T18:18:54+5:302018-09-01T18:24:25+5:30
नाशिककर जैन समाजबांधवांसाठी मुनिश्री तरुणसागरजींचा नाशकात मुक्काम ही पर्वणीच ठरली होती. तरुणसागरजी महाराज हे परखड व कटू प्रवचनासाठी प्रसिध्द होते. ४ जुलै २००४साली तरुणसागरजींचे नाशिक कुंभनगरीत आगमन झाले होते
नाशिक: जैन समाजाचे धर्मगुरू राष्ट्रसंत क्रांतिकारी मुनिश्री तरुणसागरजी महाराज यांच्या निधनाने संपूर्ण जैन समाजासह देशाची हानी झाली आहे. ते ५४ वर्षांचे होते. नाशिक आणि तरुणसागरजी महाराज यांचा मोठा संबंध आहे. २००४ साली चातुर्मास सत्संगानिमित्त तरुणसागरजींचा सहवास येथील सकल जैन समाजाला सुमारे पाच महिने लाभला होता. सकल नाशिक जैन समाजाच्या निमंत्रणाला मान देऊन तरुणसागरजी महाराज त्यावेळी चातुर्मास सत्संगाला उपस्थित राहिले होते. त्यांची विराट धर्म सभा, २१ दिवसांचा प्रेरणा महोत्सव, म्हसरुळ येथील गजपंथ मंदिरात झालेले विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून तरुणसागरजी यांनी आपल्या प्रवचनातून दिलेली शिकवण नाशिककरांसाठी अविस्मरणीयच आहे. नाशिककर जैन समाजबांधवांसाठी मुनिश्री तरुणसागरजींचा नाशकात मुक्काम ही पर्वणीच ठरली होती.
मुनिश्री तरुणसागरजी महाराज हे परखड व कटू प्रवचनासाठी प्रसिध्द होते. ४ जुलै २००४साली तरुणसागरजींचे नाशिक कुंभनगरीत आगमन झाले होते. त्यांच्या येण्याने संपुर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळी चातुर्मासनिमित्ताने रविवार कारंजा चौकात विराट धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी तरुणसागरजी महाराज यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले होते, ‘मी कुठलीही धार्मिक कथा सांगायला आलो नाही तर तुमच्या जीवनाची व्यथा सांगायला आलो आहे’ समाजबांधवांची मोठी उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली होती. यावेळी त्यांनी आनंदी जीवन जगण्याचा मार्ग सांगताना हरविलेल्या हास्यावर प्रकश टाकत ‘आज मानवाच्या चेहऱ्यावरील हास्य असे गायब झाले आहे, जसे निवडणूकानंतर पुढारी गायब होतात’ असे सोदाहरण सांगितले होते. दरम्यान, डोंगरे वसतीगृह मैदानावर २१ दिवसीय प्रेरणा महोत्सव पार पडला होता. यावेळी तरुणसागरजी यांनी विविध विषयांवर २१ दिवस नाशिककरांना मार्गदर्शन केले होते. या महोत्सवात तरुणसागरजी यांनी दुखीतांचे अश्रू पुसणे हीच ईश्वरपूजा, साधु-संतांमधील सुसंवाद राष्टसाठी उपकारक, माता-महात्मा अन् परमात्मा हेच सर्वश्रेष्ठ, मातृ-पितृ अतिथि देवोभव: ही भारतीय संस्कृती अशा विविध विषयांवर प्रवचनातून प्रकाश टाकल्याची माहिती राजेंद्र पहाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
नाशिककरांच्या वतीने सन्मान
गोदाकाठावर नाशिककरांच्या वतीने महापालिके कडून कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी तरुणसागरजी महाराज, प्रतिकसागरजी महाराज यांचा अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला होता. यावेळी त्यांनी आपल्या क टु प्रवचनाने नाशिककरांची मने जींकली होती.
--