हजारो कंठातून निनादला 'रामनामा'चा गजर! रामलला प्राणप्रतिष्ठेचा क्षण काळाराम मंदिरात!

By धनंजय रिसोडकर | Published: January 22, 2024 01:56 PM2024-01-22T13:56:44+5:302024-01-22T13:57:14+5:30

डमरूच्या तालावर शंखनादाचा गजर...

Nashik Kalaram Mandir witness Ayodhya Ram Mandir Pranpratishtha | हजारो कंठातून निनादला 'रामनामा'चा गजर! रामलला प्राणप्रतिष्ठेचा क्षण काळाराम मंदिरात!

हजारो कंठातून निनादला 'रामनामा'चा गजर! रामलला प्राणप्रतिष्ठेचा क्षण काळाराम मंदिरात!

धनंजय रिसोडकर, नाशिक: मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा क्षण जसा जसा जवळ येऊ लागला तसंतशी भाविकांमधली उत्कंठा शिगेला पोहोचली... ताशा, ढोलकी अन घंटांसह झांजांचा तुफान नाद सुरू झाला. डमरूच्या तालावर शंखनादाचा गजर... घोषणांच्या सातत्यपूर्ण जयघोषात रामलल्लाची मूर्ती पडद्यावर दिसताक्षणी हजारो कंठांमधून एकाच वेळी 'जय श्रीराम' 'सियावर रामचंद्र की जय', 'जय सिता राम सीता' चा वारंवार जयघोष करत भाविकांनी अयोध्येतील रामलल्ला मूर्ती  प्रतिष्ठापनेचा क्षण नाशिकचा काळाराम मंदिरात याची देही याची डोळा अनुभवला. 

काळाराम मंदिरासह संपूर्ण परिसर भगवे झेंडे आणि भगव्या पिवळ्या रंगाच्या झेंडूच्या माळांनी फुलून गेला होता. गळ्यात भगवी उपरणी डोक्यावरती भगव्या टोप्या आणि मुखात राम नामाचा गजर करीत हजारो भाविक शिस्तबद्धपणे रांगांनी मंदिरात दर्शनासाठी दाखल होत होते. संपूर्ण परिसरात काढण्यात आलेल्या आकर्षक आणि रंगीबेरंगी रांगोळ्यांनी का राम मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांचे लक्ष वेधून घेतले होते. मंदिराच्या परिसरातील प्रत्येक कोपऱ्याला आणि बाराखडीला देखील फुलमाळ्नी सजवण्यात आले होते. मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या माथ्यावर अष्टगंध चंदन मिश्रीत तिलकाचा टिळा लावण्यात येत होता.
काळाराम मंदिराच्या आतील भागात फुलांसह नव्याने आलेल्या द्राक्षांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. त्यामुळे मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करणाऱ्या भाविकांचे मन उत्फुल्ल आनंदाने भरून जात होते.
 पारंपारिक वेश परिधान करून आलेल्या हजारो भाविकांच्या कंठातून निघणाऱ्या घोषणांनी काळाराम मंदिराचा परिसर दणाणून गेला होता.  झेंडूच्या माळांसह भाविकांच्या प्रफुल्लित चेहऱ्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात अयोध्येतील रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

इन्फो

काळाराम मंदिर गाभाऱ्यात जन्मोत्सवाचा माहोल

 जय श्रीराम, सियावर रामचंद्र की जय जय घोष करण्यात आला आणि दुपारी बाराच्या सुमारास नेहमीप्रमाणे ढोल वाद्यांचे नगारे वाजू लागले. मंदिराच्या गाभाऱ्यात सुरू असलेली आरती पूर्ण होऊन पडदा बाजूला सरकताच जणू राम जन्मोत्सव असल्याच्या उत्साहात भाविकांनी एकच जल्लोष केला.

इन्फो
स्क्रीनवरील मूर्तीच्या पदस्पर्शासाठी झुंबड

काळा मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या स्क्रीनवर हा सोहळा प्रत्यक्ष पाहण्यासाठी देखील भाविकांची प्रचंड गर्दी जमली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रतिष्ठापना होऊन ज्या क्षणी मूर्तीचे पूर्ण रूप स्क्रीनवर दाखविण्यात आले त्याच क्षणी राम नामाच्या प्रचंड जयघोषासह स्क्रीनवरील मूर्तीचा पदस्पर्श करण्यासाठी देखील स्क्रीनजवळ झुंबड उडाली होती.

Web Title: Nashik Kalaram Mandir witness Ayodhya Ram Mandir Pranpratishtha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.