नाशिक ते खडकेद बस सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:15 AM2021-09-24T04:15:30+5:302021-09-24T04:15:30+5:30
सर्वतीर्थ टाकेद : आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होऊन दोन महिने झाले तरी एस.टी. बसेस सुरू न ...
सर्वतीर्थ टाकेद : आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होऊन दोन महिने झाले तरी एस.टी. बसेस सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने किंवा दररोज दहा ते पंधरा कि.मी. पायपीट करावी लागत असल्याने आंबेवाडी ते टाकेद या मार्गावर त्वरित बसेस सुरू करण्याची मागणी हरिदास लोहकरे, सरपंच तारा बांबळे, उपसरपंच रामचंद्र परदेशी, प्राचार्य तुकाराम साबळे, कुंदा जोशी, आदींसह त्रस्त विद्यार्थांनी केली आहे.
इगतपुरी तालुक्यातील टाकेद येथे शासनाच्या आदेशानुसार व ग्रामपंचायतच्या मान्यतेने इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू आहेत. सद्या सकाळी साडेसात ते अकरा असे कॉलेज असते. यासाठी आंबेवाडी, खडकेद, इंदोरे, वासाळी, बारशिंगवे, सोनोशी, राहुल नगर, शिरेवाडी, मायदरा, बांबळेवाडी, घोडेवाडी या मार्गावरून १२० मुली व ७८ मुले प्रत्येकाच्या सोयीने कॉलेजसाठी येतात. सद्या वासाळी मुक्कामी बस आहे; पण ती कधीतरी येते. ती आंबेवाडी मुक्कामी केल्यास येण्याचा प्रश्न सुटेल व जाण्यासाठी या मुलांना कधीच सोय नाही, ती होणे गरजेचे आहे.
टाकेद विद्यालयात आठवी ते दहावीची शेकडो मुले-मुली आहेत. या मुलांना नाशिक आगाराची बस दोन वर्षांपूर्वी सुरू होती; पण कोरोना काळापासून ती बंद आहे. यामुळे मुलांबरोबर नागरिकांनाही नाशिकला जाण्यासाठी सोय नसल्याने ही बस त्वरित सुरू करावी व इतर बसेस ईगतपुरी आगाराने शाळेबरोबर चर्चा करून योग्य तो मार्ग काढावा व विद्यार्थी न नागरिकांची योग्य ती सोय करावी, अशी मागणी होत आहे.
नाशिक आगाराच्या सकाळी पावणेआठ व नऊची सीबीएस येथून सुटणाऱ्या बसेस सुरू केल्यास सर्वांचीच सोय होईल व ईगतपुरी आगाराने ही दररोज बस सुरू करावी, अशी मागणी राम शिंदे, रतन बांबळे, वासाळी सरपंच काशिनाथ कोरडे, दिलीप पोटकुले, आदींनी केली आहे.