नाशिकमध्ये बिबट्याचा इसमावर पहाटेच्या सुमारास हल्ला; बालंबाल बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 02:19 PM2017-10-03T14:19:54+5:302017-10-03T14:23:43+5:30
नंदू बहाद्दूर परदेशी नावाचे गावातील रहिवासी हे पहाटेच्या सुमारास प्रातविधीसाठी मोकळ्या भुखंडाच्या दिशेने जात असताना बिबट्याने अचानकपणे हल्ला केला.
नाशिक : जिल्ह्यातील चांदवड तालुक्यामधील धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हट्टी गावात पहाटेच्या सुमारास बिबट्याने एका व्यक्तीवर हल्ला केला. नंदू बहाद्दूर परदेशी नावाचे गावातील रहिवासी हे पहाटेच्या सुमारास प्रातविधीसाठी मोकळ्या भुखंडाच्या दिशेने जात असताना बिबट्याने अचानकपणे हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या पायाला बिबट्याच्या नखांचे ओरखेडे लागले आहे. या हल्ल्यात ते बालंबाल बचावले. नाशिकमधील निफाड, दिंडोरी, चांदवड या तालुक्यांमध्ये सध्या बिबट्याचा वावर वाढला आहे. सातत्याने बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. याबरोबरच वनविभागाच्याही अडचणींमध्ये वाढ झाली आहे. निफाड, दिंडोरी तालुक्यांमध्ये युध्दपातळीवर वनविभागाचे वनरक्षकांची टीम कार्यरत असून सातत्याने बिबट्यांचा शोध घेत त्यांना जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत; मात्र अद्याप यश आलेले नाही. वनविभाग शर्थीचे प्रयत्न करत आहे; मात्र वन्यजीव असल्यामुळे त्याला लवकर जेरबंद करण्यामध्ये काहीसे प्रयत्न अयशस्वी ठरत आहे.