Nashik: लोकवस्तीत तीन तासांच्या थरारानंतर बिबट्याची बंगल्यातून सुरक्षित सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 02:09 PM2022-07-02T14:09:46+5:302022-07-02T14:12:07+5:30
Nashik: सकाळी पावसाची संततधार सुरू असल्याने नेहमीच्या तुलनेत अशोकनगर परिसरात मानवी वर्दळ शनिवारी कमी होती. राज्य कर्मचारी वसाहतीत बिबट्याने पहाटेच्या सुमारास शिरकाव केला.
नाशिक - सातपुरच्या अशोकनगर भागातील खंडेराव मंदिर परिसरात शनिवारी (दि.१) रहिवाशी भाागात बिबट्याने सकाळी ‘एन्ट्री’ केली. एका बंगल्याच्या आवारातील शौचालय आणि जिन्याच्या मध्यभागी असलेल्या जागेत बिबट्या दडला. सकाळी साडेआठ वाजच्या सुमारास येथील रहिवाशांना बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज आला आणि त्याने डरकाळी फोडली. माहिती मिळताच अवघ्या काही मिनिटांत वनविभागाच्या रेस्क्यू टीमचा लवाजमा घटनास्थळी पोहचला. बिबट्याला रेस्क्यू करण्याची मोहिम सुरु झाली. दोन तासांच्या थरारनंतर बिबट्या सुरक्षितरित्या जेरबंद करण्यास वनखात्याला यश आले.
सकाळी पावसाची संततधार सुरू असल्याने नेहमीच्या तुलनेत अशोकनगर परिसरात मानवी वर्दळ शनिवारी कमी होती. राज्य कर्मचारी वसाहतीत बिबट्याने पहाटेच्या सुमारास शिरकाव केला. येथील पंढरीनाथ काळे यांच्या बंगल्यात शौचालय आणि जिन्याच्यामध्ये असलेल्या लहानशा जागेत शौचालयावर बिबट्याने आश्रय घेतला. सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास येथील रहिवाशांना बिबट्याने दर्शन दिले. यावेळी काळे यांना त्यांच्या समोरील रहिवाशांनी फोन करून जिन्यावर बिबट्याची हालचाल दिसत असल्याचे सांगितले. त्यानंतर काळे यांनी दरवाजा उघडला आणि बाहेर येऊ बघितले असता बिबट्या शौचाल्याच्या वरच्या भागात बसलेला दिसला. त्यांनी त्वरित घरात धाव घेत दरवाजा व खिडक्या बंद केले आणि आपल्या शेजाऱ्यांनाही कल्पना देत घराबाहे पडू नये, असे सांगून सावध केले. सातपुर पोलिसांना व वनखात्याला माहिती रहिवाशांकडून देण्यात आली. माहिती मिळताच इगतपुरी वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस, वनपाल अनिल अहिरराव यांनी त्वरित लवाजमा घेत घटनास्थळ गाठले.
बिबट्याला तभुलीचे औषधाने भरलेले इंजेक्शन ब्लोपाइपद्वारे सोडले. हे इंजेक्शन त्याच्या शरिराला लागलेसुद्धा मात्र बिबट्या अधिक आक्रमक होऊन सैरावैरा धावत बंगल्यातून बाहेर झेपावला. कॉलनीच्या रस्त्यावरून धावत येथील खंडेराव महाराज मंदिराच्या आवारातील दुसऱ्या बंगल्यात बिबट्या दडून बसला. यावेळी पुन्हा पशुवैद्यकिय अधिकारी वैशाली थोरात यांनी बिबट्याचे हालचालींचे निरिक्षण करत पुन्हा भुलीचे इंजेक्शन देण्याचा निर्णय वनक्षेत्रपाल बिरारीस यांना सांगितला. त्यानुसार त्यांनी भरून दिलेल्या औषधाचे इंजेक्शनचा दुसरा ‘डार्ट’ ब्लोपाइपद्वारे दिला गेला. यानंतर अडीच वर्षांचा मादी बिबट्या बंगल्यात बेशुद्ध पडला आणि रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.