Nashik: नाशिकमध्ये बिबट्या पुन्हा लोकवस्तीत, 'मॉर्निंग वॉक'ला निघालेले पती-पत्नी बालंबाल बचावले

By अझहर शेख | Published: July 13, 2023 03:43 PM2023-07-13T15:43:01+5:302023-07-13T15:48:13+5:30

Nashik: गुरुवारी पहाटे सव्वापाच वाजता जयभवानी रोडवरील आडकेनगर लेन-२मध्ये राहणारे  शिंदे दाम्पत्य नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडले खरे; मात्र त्याचवेळी त्यांना जीव मुठीत धरून सुरक्षितस्थळी धावावे लागले

Nashik: Leopards re-inhabited in Nashik, husband and wife on 'morning walk' survive | Nashik: नाशिकमध्ये बिबट्या पुन्हा लोकवस्तीत, 'मॉर्निंग वॉक'ला निघालेले पती-पत्नी बालंबाल बचावले

Nashik: नाशिकमध्ये बिबट्या पुन्हा लोकवस्तीत, 'मॉर्निंग वॉक'ला निघालेले पती-पत्नी बालंबाल बचावले

googlenewsNext

- अझहर शेख
नाशिक - गुरुवारी पहाटे सव्वापाच वाजता जयभवानी रोडवरील आडकेनगर लेन-२मध्ये राहणारे  शिंदे दाम्पत्य नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडले खरे; मात्र त्याचवेळी त्यांना जीव मुठीत धरून सुरक्षितस्थळी धावावे लागले; कारण समोरच बिबट्या झाडाच्या आडोशाला दडून बसलेला त्यांच्या नजरेस पडला. यावेळी  बिबट्या त्यांना बघून गुरगुरला आणि डरकाळी फोडत समोरच्या बंगल्याच्या कुंपणात झेप घेतली. यावेळी संरक्षक भिंतीच्या आडोशाने उभे असलेले नवनाथ शिंदे यांनी प्रसंगावधान राखत जमिनीवर झोपल्याने ते बालंबाल बचावले.

नाशिक वनपरिक्षेत्र हद्दीतील उपनगरजवळील जयभवानी रोडलगत असलेल्या आडकेनगर, लवटेनगर भागात पहाटेच्या सुमारास शिंदे दाम्पत्याला बिबट्याने दर्शन दिले. यावेळी दोघेही प्रचंड घाबरले. त्यांचे दैव बलवत्तर असल्याने बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली नाही, अन्यथा अनर्थ घडला असता. शिंदे दाम्पत्याने आजूबाजूच्या लोकांना जागे केले. त्यानंतर ‘डायल११२’ला कॉल करून माहिती दिली. पोलिसांनी वन खात्याला कळवताच रात्रीचे वन गस्तीपथक घटनास्थळी आले. सात वाजता वनपरिक्षेत्र अधिकारी वृषाली गाडे, वनपरिमंडळ अधिकारी उत्तम पाटील, अनिल अहिराव, शैलेंद्र झुटे, वनरक्षक राजेंद्र ठाकरे, दीपक जगताप, ज्ञानेश्वर शिंदे, सचिन आहेर, रेस्क्यू वाहनचालक अशोक खानझाडे, सुनील खानझोडे, प्रवीण राठोड, दर्शन देवरे यांची दोन पथके एकापाठोपाठ दाखल झाली. इको-एको-रेस्क्यूच्या स्वयंसेवकांचीही कुमक साधनसामुग्रीसह पोहोचली.लवटेनगरमध्ये व पुढे आर्टिलरी सेंटरच्याजवळ कुंपणालगत आढळून आले. यावरून बिबट्याने लष्करी हद्दीतील जंगलात धूम ठोकल्याचा निष्कर्ष वन पथकाने लावला.
  
जयभवानी रोडजवळ लष्करी हद्दीतील जंगल आहे. यामुळे कधी-कधी बिबट्या भरकटून लोकवस्तीत येतो. या भागातील रहिवाशांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा. परिसरात भटक्या श्वानांची संख्या जास्त असल्याचे दिसले. हे श्वान बिबट्याची सहज सोपी शिकार असल्याने त्यांच्या शिकारीसाठीही बिबट्या या भागात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी सतर्क राहावे. जॉगिंगला जाताना हातात काठी ठेवावी. शक्यतो दिवस उजाडल्यावर घराबाहेर पडावे.
- वृषाली गाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, नाशिक

Web Title: Nashik: Leopards re-inhabited in Nashik, husband and wife on 'morning walk' survive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.