वाजे, भगरे आज दाखल करणार उमेदवारी अर्ज; मविआचे दिग्गज नेते हजर राहणार
By Suyog.joshi | Published: April 29, 2024 08:56 AM2024-04-29T08:56:07+5:302024-04-29T08:56:53+5:30
खा.राऊत, पाटील, थोरात यांची उपस्थिती, नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी येत्या वीस मे रोजी मतदान होणार असून तीन मे पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे
नाशिक - महाविकास आघाडीचे नाशिकचे उमेदवार राजाभाऊ वाजे व दिंडोरीचे उमेदवार भास्कर भगरे आज सोमवारी (दि.२९) जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरणार आहे. यावेळी खासदार संजय राऊत, जयंत पाटिल व बाळासाहेब थोरात हे नेते उपस्थित राहणार असून या वेळी महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापणार आहे.
नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी येत्या वीस मे रोजी मतदान होणार असून तीन मे पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. महविकास आघाडी त्यांच्या उमेदवारांचे आज मोठे शक्तिप्रदर्शन करत अर्ज भरणार आहे. त्यासाठी तिन्ही पक्षांच्या मोठ्या नेत्यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शालिमार येथील उद्धव सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयापासून सकाळी नऊ वाजता महारॅली सुरुवात होईल. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही रॅली काढली जाईल. जिल्हाप्रशासनाने दोन्ही उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी सकाळी दहा वाजेची वेळ दिली आहे. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
शांतिगिरी महाराज यांची रॅली
जय बाबाजी परिवाराचे शांतिगिरी महाराज हे देखील नाशिक लोकसभेच्या आखाड्यात अपक्ष उतरले आहे. ते देखील सोमवारी भक्त परिवाराची रॅली काढत शक्तिप्रदर्शन करणार आहे.