आधीच तिढा सुटेना, त्यात नाशिकमध्ये नवे त्रांगडे; गावित अन् शांतिगिरी महाराज यांचे अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 09:34 AM2024-04-27T09:34:22+5:302024-04-27T09:35:15+5:30
शांतिगिरी महाराज यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीला देखील धक्का असल्याचे मानले जात आहे.
नाशिक - लोकसभेच्या दिंडोरी मतदारसंघातून माकपाचे माजी आमदार जे. पी. गावित यांनी अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडी, तर नाशिकमधून शांतिगिरी महाराज यांनी उमेदवारी दाखल केल्याने महायुतीला धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी २० मे राेजी मतदान होणार असून, त्यासाठी शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. नाशिकमध्ये पहिल्याच दिवशी तीन अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
हेमंत गोडसेंनीही नेला अर्ज
नाशिकमधून अन्य ६४ इच्छुकांनी अर्ज नेले असून त्यात विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचाही समावेश आहे. महायुतीकडून अद्याप उमेदवारीची घोषणा झाली नसताना गोडसे तसेच अन्य इच्छुकांनी देखील अर्ज नेले आहेत. मनसे आणि शिंदेसेनेच्या संपर्कात असलेल्या प. पू. शांतिगिरी महाराज यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीला देखील धक्का असल्याचे मानले जात आहे. महाराज यांनी नाशिकमधून प्रथमच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
प्रीतमबद्दल मी गमतीने म्हटले होते; नाशिककरांनी अस्वस्थ होऊ नये : पंकजा
काळजी करू नका, प्रीतम मुंडे यांना नाशिकमधून उमेदवारी देईन, असे वक्तव्य आपण गंमतीने केले होते. नाशिकमधील लोकांनी अस्वस्थ होण्याची गरज नाही. तसेच, छगन भुजबळ यांनी दिलेला सल्ला मी वडिलकीच्या नात्याने स्वीकारते, असा खुलासा बीडमधील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी केला. पालकमंत्री तथा भाऊ धनंजय मुंडे यांच्याबाबतही पंकजा यांनी वक्तव्य केले. २०१४ मध्ये त्यांनी जीव तोडून विरोधात प्रचार केला. जसा तेव्हा विरोध केला तसा आता प्रचार करत आहेत.