सिडकोत उत्साहपूर्ण वातावरणात मतदानाला सुरुवात
By Suyog.joshi | Published: May 20, 2024 09:36 AM2024-05-20T09:36:11+5:302024-05-20T09:36:39+5:30
अपवाद वगळता सकाळी सात वाजतापासून सुरळीतपणे मतदानाला सुरुवात झाली.
नाशिक (सुयोग जोशी): नाशिक लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रावर अपवाद वगळता सकाळी सात वाजतापासून सुरळीतपणे मतदानाला सुरुवात झाली.
तापमानाची झळ लागू नये म्हणून प्रशासनाने ही खबरदारी घेत मतदारांना सकाळी लवकरात लवकर मतदान करून उन्हापासून बचाव करावा, असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत काही भागात नागरिकांनी सकाळपासूनच उन्हाच्या भीतीमुळे सिडकोतील सर्वच मतदान केंद्रावर गर्दी केली आहे.
उन्हाचा पारा वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन मतदानासाठी सर्वत्र रांगा लागलेल्या आहे. पाथर्डी गावातील एका केंद्रात दहा मिनिटे मतदान सुरू होण्यास उशीर झाला.
दरम्यान, स्वामी विवेकानंद शाळा व डे केअर सेंटर शाळा या दोन्ही मतदान केंद्रावर सकाळी लांबच लांब रांगा लावून मतदारांचा उत्साह दिसून आला. तसेच मोबाईल मतदान केंद्रास नेण्यास पोलीस मज्जाव करत होते. गेल्या दोन दिवसापासून दिवसागणिक उन्हाचा तडाका वाढत आहे. परिसरातील मतदारांनी दुपारी उन्हाच्या तडाख्यात न येता सकाळी सात वाजेपासून लांबच लांब रांगा लावून मतदानासाठी बूथवर गर्दी केली होती. सकाळी मतदानासाठी एका मतदाराला कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटे लागत होते. तसेच मतदान केंद्र बाहेर असलेल्या बुथवर स्लिप घेण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून आली.