प्रायव्हेट क्लासमध्ये नाशिकचा लोखंडे विजेता
By admin | Published: May 18, 2014 11:30 PM2014-05-18T23:30:38+5:302014-05-18T23:45:50+5:30
एमआरएफ सुपरक्रॉस : फॉरेन क्लासचा के. पी. अरविंद अजिंक्य
एमआरएफ सुपरक्रॉस : फॉरेन क्लासचा के. पी. अरविंद अजिंक्य
नाशिक : तब्बल १५ वर्षांनंतर नाशकात झालेल्या एमआरएफ सुपरक्रॉस मोटारसायकल राष्ट्रीय स्पर्धेमध्ये नाशिकच्या गणेश लोखंडे याने नामांकित रायडर्सला मागे टाकत प्रायव्हेट क्लासचे विजेतेपद पटकावले, तर फॉरेन क्लासमध्ये अपेक्षेप्रमाणे नॅशनल चॅम्पियन बंगळुरूचा के. पी. अरविंद याने चुरशीच्या झालेल्या स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले. सदरील स्पर्धेची दुसरी फेरी पुण्यात रंगणार आहे.
पाथर्डी गावालगत व पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेल्या निसर्गरम्य परिसरातील कुटेज् डर्टी ट्रॅकवर एमआरएफ मॉग्रीफ सुपरक्रॉस चॅम्पियनशिपच्या पहिल्या फेरीची स्पर्धा अत्यंत चुरशीच्या वातावरणात संपन्न झाली. एमआरएफ व गॉडस्पीड आणि ऑटोमोटिव्ह स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे (नासा) आयोजित करण्यात आलेल्या सदरील स्पर्धेसाठी राष्ट्रीय पातळीवरील रायडर्ससह नाशिकचेही रायडर्स सहभागी झाले होते. त्यामुळे स्पर्धेमध्ये जबरदस्त चुरस पाहावयास मिळाली.
राष्ट्रीय स्पर्धेसाठी महत्त्वाच्या फॉरेन क्लासमध्ये नॅशनल चॅम्पियन बंगळुरूचा के. पी. अरविंद याने पहिल्या फेरीत अव्वल, तर दुसर्या फेरीत दुसर्या स्थानावर असतानाही वेग अन् गुण कमविण्यात अव्वल ठरल्याने या गटाचा तो विजेता ठरला. त्याने दोन्ही फेर्यांतून ३७ गुण मिळविले. दुसर्या स्थानी त्याचाच साथीदार हरिथ नोहा राहिला. पहिल्या फेरीत दुसरे, तर दुसर्या फेरीत त्याने अव्वल स्थान पटकावत अरविंदला मागे टाकले होते. दोघांनीही समान गुण मिळविले असले, तरी वेगात मात्र कमी पडल्याने त्याला उपविजेता पदावरच समाधान मानावे लागले. तिसर्या स्थानी प्रमोद जोशुवा (३० गुण), चौथ्या स्थानी जयपूरचा गौरव खत्री (२६ गुण), तर नागपूरचा जतिन जैन (२२ गुण) पाचव्या स्थानी राहिला.
सदर स्पर्धेच्या प्रायव्हेट क्लासमध्ये नाशिकच्या गणेश लोखंडे याने अत्यंत चुरशीच्या लढतीमध्ये नामांकित रायडर्सला मागे टाकत ४० गुणांसह अव्वल स्थान पटकावले. विशेषत: त्याने दोन्ही फेर्यांमध्ये अव्वल स्थान राखत निर्विवाद वर्चस्व राखले. दुसर्या स्थानी राहिलेल्या जिग्नेश पटेल याने लोखंडेला मागे टाकण्याचा प्रत्येक वळणावर प्रयत्न केला; परंतु गणेशच्या वेगापुढे तो कमी पडला. त्याने ३२ गुण घेतले. पुण्याचा अश्विन जाधवही ३२ गुणांसह तिसर्या, तर मंुबईचा जईन खान व नाशिकचा आदित्य ठक्कर अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानी राहिले. सदर स्पर्धेची दुसरी फेरी पुण्यात रंगणार आहे.
ज्युनिअर्समध्ये ऋग्वेद प्रथम
स्पर्धेसाठीचे खास आकर्षण असलेल्या लहान गटात अपेक्षेप्रमाणे पुण्याच्या ऋग्वेद बारगुजे याने अव्वल स्थान पटकावले. दुसर्या स्थानी यश पवार, तिसर्या स्थानी पुण्याचाच युवराज कोंडे देशमुख, तर मंुबईचा अश्विनद्र विर्दी व सार्थक चव्हाण हे अनुक्रमे चौथ्या व पाचव्य स्थानी राहिले.
नाशिकच्या कोहोकची रायडिंग
ज्युनिअर्स गटाच्या प्रदर्शनीय स्पर्धेत सर्वात लहान अर्थात ८ ते ९ वर्षांचे तिघे सहभागी झाले होते. यात नाशिकचा अवॉन कोहोक, पुण्याचा युवराज कोंडे देशमुख आणि सार्थक चव्हाण यांचा समावेश होता. युवराज तर तरबेज रायडर्ससारखी कसरत दाखवित उंचवट्यांवरून जम्प घेत होता. अवघड वळणावर माती उडवित राईड करीत त्याने उपस्थितांचे लक्ष्य वेधून घेतले होते.