महाबोधी वृक्षाला फुटली पालवी; दोन उद्यान कर्मचाऱ्यांची नियुक्ती
By Suyog.joshi | Published: November 2, 2023 11:18 AM2023-11-02T11:18:57+5:302023-11-02T11:21:30+5:30
महाबोधी वृक्षाला दिवसाआड पाणी दिले जात आहे.
नाशिक (सुयोग जोशी): श्रीलंकेतील अनुराधापूर येथून आणलेल्या महाबोधी वृक्षाचे दि. २४ ऑक्टोबर रोजी रोपन करण्यात आले. त्या वृक्षाला नुकतीच पालवी फुटली असून महापालिकेच्यावतीने दोन सुरक्षा रक्षक तर दोन उद्यान कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाबोधी वृक्षाला दिवसाआड पाणी दिले जात आहे. झाडाच्या निगराणीसाठी उद्यान विभागाच्या दाेन कर्मचाऱ्यांची तर सुरक्षेसाठी दोन सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांनी दिली.
महाबोधी वृक्षाचे बुद्धस्मारक येथे २४ ऑक्टोबररोजी आगमन झाले. श्रीलंकेहून हा वृक्ष विमानाने आणल्यानंतर मुंबई येथे नाशिक महापालिकेची उद्यान विभागाची टीम गेली होती. त्यांनी संबंधित भन्ते यांच्याकडून या वृक्षाचा ताबा घेतला. त्यानंतर त्याची निगराणी राखत हा वृक्ष पपाया नर्सरीत तीन दिवस ठेवण्यात आला होता. तेथे नर्सरीच्या कर्मचाऱ्यांसह उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या वृक्षाची काळजी घेतली व कार्यक्रमाच्या ठिकाणी वृक्ष आणण्यात आला हाेता. या वृक्षाच्या निगरणासाठी गांडूळ खताबरोबरच इतर खतेही देण्यात येत आहे. वृक्षाच्या आजूबाजूला गवत वाढू देऊ नये, वृक्षाची जागा भुसभुशीत कशी होईल याची काळजी दररोज घेत असल्याची माहिती भदाणे यांनी दिली.