दर्शनाची ओढ तुझ्या लागली.....
By Suyog.joshi | Published: February 5, 2024 08:57 PM2024-02-05T20:57:37+5:302024-02-05T20:57:51+5:30
नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. अर्थातच सिटीलिंकच्या वतीने जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
नाशिक (सुयोग जोशी) : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रा यात्रेनिमित्त लाखो भाविक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी दाखल होत आहे. शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात भाविकांनी त्र्यंबककडे जाणाऱ्या बसेससाठी गर्दी केली आहे. अनेक भाविकांना श्री निवृत्तीनाथांच्या दर्शनाची ओढ लागली आहे. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता सिटीलींकच्यावतीने सोमवार, दि. ६ फेब्रुवारी रोजी तपोवन डेपोच्या ३ व नाशिकरोड डेपोच्या ११ अशा एकूण १४ जादा बसेसचचे नियोजन केले असून एकूण ९० अतिरिक्त बसफेऱ्या करण्यात येणार आहे. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या चरणी लाखो भाविक नतमस्तक होतात. यात्रेकरता लाखो भाविकांची होणारी गर्दी व भाविकांना संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी जाता यावे यासाठी नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. अर्थातच सिटीलिंकच्या वतीने जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
सद्यस्थितीत सिटीलिंकच्या वतीने नाशिकरोड ते त्र्यंबकेश्वर व निमाणी ते त्र्यंबकेश्वर या मार्गावर दैनंदिन २८ बसेसच्या माध्यमातून एकूण १८० बसफेऱ्या होतात. परंतु यात्रेदरम्यान ६ व ७ फेब्रुवारी दोन दिवस या अतिरिक्त बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या दोनही दिवशी दैनंदिन २८ व अतिरिक्त ११ अशा एकूण ३९ बसेसच्या माध्यमातून २७० बसफेऱ्या करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त भाविकांनी या जादा बसेसचा लाभ घेण्याचे आवाहन सिटीलींकच्या वतीने करण्यात आले आहे.