नाशिक, मालेगाव महापौरपदाच्या आरक्षणाचा आज होणार फैसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 01:01 AM2019-11-13T01:01:19+5:302019-11-13T01:01:54+5:30
नाशिक आणि मालेगावसह राज्यातील २७ महापालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाचा फैसला बुधवारी (दि. १३) होणार आहे. यंदाचे महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी जाणार त्यावर राजकीय गणिते ठरणार आहेत. राज्यात राजकीय समीकरणे बदलणार असल्याने उत्सुकता असणार आहे.
नाशिक : नाशिक आणि मालेगावसह राज्यातील २७ महापालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाचा फैसला बुधवारी (दि. १३) होणार आहे. यंदाचे महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी जाणार त्यावर राजकीय गणिते ठरणार आहेत. राज्यात राजकीय समीकरणे बदलणार असल्याने उत्सुकता असणार आहे.
बुधवारी (दि. १३) दुपारी ३ वाजता मुंबईत मंत्रालयात ही सोडत काढली जाणार आहे. त्यासाठी राज्यभरातील महापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह आणि विरोधी पक्षनेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. सदरची सोडत काढण्यापूर्वी राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने २००१ पासून महापौरपदासाठी कोणत्या कोणत्या प्रवर्गाचे आरक्षण होते याची माहिती मागविली होती. (पान ७ वर)
नाशिक महापालिकेत यापूर्वी खुले, ओबीसी, ओबीसी महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अशा प्रवर्गांना संधी मिळाली असली तरी यंदा अनुसूचित जमाती वगळता कोणत्याही प्रकारचे आरक्षण निघू शकते. नाशिकमध्ये २०१७ मध्ये अनुसूचित जमातीसाठी महापौरपद आरक्षित होते. त्यामुळे रंजना भानसी महापौर झाल्या आहेत, तर मालेगावी सध्या खुल्या प्रवर्गातून कॉँग्रेसचे असिफ शेख हे महापौर आहेत. त्यामुळे कोणत्या महापालिकेत कोणते आरक्षण निघते याबाबत उत्सुकता आहे.