Nashik: नाशिक जिल्ह्यात मराठा आंदोलनाची धग कायम
By धनंजय वाखारे | Published: September 7, 2023 04:55 PM2023-09-07T16:55:18+5:302023-09-07T16:55:55+5:30
Nashik: जालना येथील मराठा समाजाच्या आंदोलकांवरील लाठीमाराच्या घटनेची धग अजूनही जिल्ह्यात कायम आहे. त्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने मालेगाव, येवला तालुक्यांतील अंगणगाव येथे गुरुवारी (दि. ७) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
- धनंजय वाखारे
नाशिक - जालना येथील मराठा समाजाच्या आंदोलकांवरील लाठीमाराच्या घटनेची धग अजूनही जिल्ह्यात कायम आहे. त्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने मालेगाव, येवला तालुक्यांतील अंगणगाव येथे गुरुवारी (दि. ७) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तर, नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील कडकडीत बंद पाळण्यात आला.
मराठा समाजाच्या आंदोलकांवरील लाठीमाराच्या घटनेची तीव्रता कायम आहे. गुरुवारी सकल मराठा समाज मालेगाव तालुक्याच्या वतीने मनमाड चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करीत प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
बोलठाण, जातेगाव, ढेकू परिसरात अखिल मराठा समाजबांधवांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन आपली दुकाने व आर्थिक व्यवहार बंद ठेवून जालना लाठीमार घटनेचा निषेध नोंदविला. आंदोलकांनी राज्य शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. महामार्गावर दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या व काही काळ वाहतूककोंडी झाली.
येवला तालुक्यातील अंगणगाव येथे नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर मराठा समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. नांदगाव तालुक्यातील घाटमाथा परिसरातील बोलठाण, जातेगाव, ढेकूसह विविध गावांतील ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवली.