नाशिकमध्ये मक्याचे भाव वाढले; गहू, बाजरीची आवक घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 01:20 PM2018-12-14T13:20:22+5:302018-12-14T13:21:30+5:30

बाजारगप्पा : गहू, बाजरी आणि इतर कडधान्यांची आवक मंदावली असून, भाव स्थिर आहेत. 

In Nashik Market Maize prices rise, Wheat and bajra in arrivals reduced | नाशिकमध्ये मक्याचे भाव वाढले; गहू, बाजरीची आवक घटली

नाशिकमध्ये मक्याचे भाव वाढले; गहू, बाजरीची आवक घटली

googlenewsNext

- संजय दुनबळे (नाशिक)

नाशिक जिल्ह्यात मक्याच्या भावात १०० रुपयांनी वाढ झाली असून, लासलगाव, मालेगाव, नांदगाव, आदी बाजार समित्यांमध्ये मक्याला १६११ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. नांदगाव बाजार समितीच्या बोलठाण उपबाजार आवारात तर दोन-तीन दिवसांपूर्वी मका १७०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत विकला गेला. गहू, बाजरी आणि इतर कडधान्यांची आवक मंदावली असून, भाव स्थिर आहेत. 

मालेगाव बाजार समितीमध्ये दररोज ४०० ते ५०० ट्रॅक्टर ट्रॉली मक्याची आवक होत आहे. मागील सप्ताहाच्या तुलनेत या सप्ताहात मक्याच्या भावात तेजी आली असल्याचे भुसार मालाचे व्यापारी भिका कोतकर यांनी सांगितले. आवक चांगली असून, सध्या मका १५५० ते १६११ रुपये प्रति क्विंटल भाव असल्याचे त्यांनी सांगितले. बाजार समितीत बाजरी आणि गव्हाची आवक मंदावली असून, त्यांचे भाव स्थिर आहेत. गव्हाला २४०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. मागील आठ दिवसांपासून मालेगाव बाजार समितीत कडधान्यांचे लिलाव बंद आहेत. माल कमी असून, उठाव नसल्यामुळे ही स्थिती असल्याचे व्यापारी कोतकर यांनी सांगितले. 

लासलगाव बाजार समितीमध्ये सर्वच भुसार मालाची चांगली आवक असून, मक्याच्या भावात वाढ झाली असल्याचे भुसार मालाचे व्यापारी सचिन ब्रह्मेचा यांनी सांगितले. लासलगावी मक्याला १६१० रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळाला. मक्याला पोल्ट्री कंपन्यांकडून मागणी वाढली असून, त्या तुलनेत बाजारात होणारी आवक कमी असल्यामुळे मक्याच्या भावात तेजी आली असल्याचे ब्रह्मेचा म्हणाले. लासलगाव बाजारातही कडधान्याची आवक मंदावली असल्याचे चित्र आहे. येथे बाजरी १५०० ते २२०० रुपये, तर गहू २२०० पासून २७०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत विकला जात आहे. 

कडधान्याची आवक कमी असली तरी सोयाबीनची थोड्याफार प्रमाणात आवक असून, ३२०० ते ३३०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. नांदगाव बाजार समितीत मक्याची आवक चांगली असून, येथेही मक्याला चांगला भाव मिळत आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी नांदगाव बाजार समितीच्या बोलठाण उपबाजारात मक्याला १७०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. साधारणत: १४४१ ते १६२१ रुपये प्रति क्विंटल भाव असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. इतर भुसार मालाची आवक फारशी होत नसल्याचे दिसून आले. 

भुसार मालामध्ये केवळ मक्याचे लिलाव होणाऱ्या चांदवड बाजार समितीत केवळ २७, २८ ट्रॅक्टर ट्रॉली मक्याची आवक होत आहे. चांदवड परिसरात असलेल्या काही खासगी कंपन्यांकडून मका खरेदी केली जात असल्याने बाजार समितीत होणारी आवक कमी झाली असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. यावर्षी दुष्काळाचाही मका पिकावर मोठा परिणाम झाला असून याचा परिणाम बाजारातील आवकवर दिसत आहे. साधारणत: फेब्रुवारी, मार्च महिन्यांत येणारी स्थिती डिसेंबरमध्येच चांदवड बाजार समितीत दिसत आहे.

Web Title: In Nashik Market Maize prices rise, Wheat and bajra in arrivals reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.