नाशिक बाजारपेठेत गहू, बाजरीच्या भावात साधली बरोबरी; मक्याचे भाव स्थिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 12:08 PM2018-12-07T12:08:50+5:302018-12-07T12:14:27+5:30
बाजारगप्पा : कडधान्यांच्या भावामध्ये थोडाफार चढ-उतार होताना दिसत आहे.
- संजय दुनबळे, (नाशिक)
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या मक्याची आवक चांगली असून, बाजारभाव स्थिर आहेत. बाजरीचे उत्पादन कमी झाल्याने बाजार समित्यांमध्ये गहू आणि बाजरीच्या भावाने काहीशी बरोबरी साधल्याचे चित्र बघायला मिळत आहे. कडधान्यांच्या भावामध्ये थोडाफार चढ-उतार होताना दिसत आहे.
उन्हाळ कांद्याला मिळणाऱ्या भावामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले असताना मका आणि इतर भुसार माल पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र काहीसा दिलासा मिळत आहे. जिल्ह्यातील लासलगाव, मालेगाव, नांदगाव, चांदवड, येवला या बाजार समित्यांमध्ये सध्या मक्याची आवक चांगली होत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही आवक तशी कमीच आहे. यामुळे मक्याने यावर्षी १५०० चा टप्पा पार केला आहे. लासलगाव बाजार समितीत १५५० ते १५६०, तर मालेगावी १५७० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मक्याला भाव मिळत आहे. सध्या बाजारात वाळलेला आणि साफ केलेला मका येत आहे. शिवाय बाहेरील कंपन्यांकडून मक्याला मागणी असल्यामुळे मक्याच्या भावात वाढ झाली असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.
यावर्षी बाजरीचे उत्पादन कमी झाल्यामुळे बाजार समित्यांमध्ये बाजरीची आवक मंदावली आहे. हिवाळा ऋतुमध्ये ग्राहकांकडून गहू, ज्वारी व्यतिरिक्त सर्वाधिक पसंती बाजरीला दिली जाते. हिवाळ्यात बाजरी खाणे पोष्टिक समजले जाते. यामुळे बाजरी सध्या चांगलाच भाव घेत आहे. मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजरी आणि गव्हाचे भाव बरोबरीत असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव अशोक देसले यांनी दिली. मागणी जास्त असल्याने बाजरीला भविष्यातही चांगला भाव राहील, असा अंदाज वर्तविला जात आहे. मालेगाव बाजार समितीत मक्याला १५७० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. येथे इतर भुसार मालाचे भाव स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
हंगामी मार्केट असलेल्या चांदवड बाजार समितीत आणि रायपूर येथील केंद्रात मक्याची चांगली आवक होत आहे. नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतही मक्याची चांगली आवक होत असून, १४७० पासून १५६९ रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत असल्याचे दिसून आले. मकावगळता नांदगावी इतर भुसार मालाची आवक किरकोळ स्वरूपात असून, या मालाचे भाव टिकून आहेत. नांदगावी बाजरीला १५६० पासून २३७५ रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. कडधान्याची आवक किरकोळ स्वरूपात असून, त्याला चांगला भाव मिळत आहे. नांदगावी तुरीला ३३०० ते ३९०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.
सोयाबीनच्या उत्पादनात बऱ्याच प्रमाणात घट झाल्याने सर्वच बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक मंदावली आहे. मात्र, भाव म्हणावा तेवढ वाढला नाहीी. सोयाबीनला लासलगावला ३२७० रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळत असल्याचे भुसार मालाचे व्यापारी नंदकुमार डागा यांनी सांगितले.