नाशिक महापौरपदाचा आज फैसलां
By Admin | Published: September 12, 2014 12:43 AM2014-09-12T00:43:06+5:302014-09-12T00:43:06+5:30
नाशिक महापौरपदाचा आज फैसलां
नाशिक : बहुमत कोणालाही नाही, मनसे-कॉँग्रेस आघाडीची गणिते महापौरपदाच्या उमेदवारीवर, तर युती अन्य पक्षांतील फुटीरांच्या भरवशावर... प्रचंड अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या चौदाव्या महापौरपदासाठी शुक्रवारी (दि. १२) निवडणूक होणार आहे. गेल्या अडीच वर्षांपासून महापालिकेवर सत्ता असलेल्या मनसेचा ‘राजगड’ टिकणार की ढासळणार याकडे आता लक्ष लागून आहे. परंतु मनसे आणि राष्ट्रवादी एकत्र आले तर नव्या राजकीय अध्यायाच्या प्रयोगावर नाशिकमध्येच शिक्कामोर्तब होणार आहे.
या निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीकडून सुधाकर बडगुजर यांची उमेदवारी आधीच निश्चित झाली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसने विक्रांत मते यांचे नाव जवळपास निश्चित केले आहे. कॉँग्रेसकडून उद्धव निमसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल आहे. मनसेकडून चार जणांचे उमेदवारी अर्ज असले, तरी अशोक मुर्तडक आणि शशिकांत जाधव यापैकी एकाचे नाव निश्चित होईल. तथापि, मनसे-आघाडीकडून जे नाव निश्चित होईल त्यांचे बडगुजर यांच्यासमोर आव्हान उभे असणार आहे. मनसे आणि आघाडी एकत्र झाल्यास त्यांचे बहुमत होत असल्याने महायुतीला पक्षांच्या फोडाफोडीच्या भरवशावर राहावे लागणार असून, त्यामुळे दिवसभर फोडाफोडीला आणि घोडेबाजाराला वेग आला होता.
नाशिकमध्ये तीन आमदार असलेल्या मनसेने अडीच वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत ४० जागा मिळवल्या. तथापि, १२२ सदस्यांच्या संख्येत ६३ हा बहुमताचा आकडा पार होत नसल्याने भाजपाने त्यांना पाठिंबा दिला होता. परंतु यंदा नाट्यमय घडामोडीत भाजपाने मनसेला सोडचिठ्ठी दिली असून, शिवसेनेला साथ दिली आहे. त्यामुळे एकाकी पडलेली मनसे आणि प्रतिस्पर्धी भाजपा-सेना यांचा विचार करून मनसे, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र झाले आहेत. तथापि, राष्ट्रवादीने महापौरपदावर दावा सांगितल्याने नव्या समीकरणावर शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यातच कॉँग्रेसने राष्ट्रवादीचा महापौर असेल तरच मतदान करण्याचा दिलेला इशारादेखील राजकीय अनिश्चितता निर्माण करणारा आहे. तिन्ही पक्ष एकत्र आले तर बहुमताचा आकडा गाठणे शक्य आहे. तथापि, कॉँग्रेसचे पाच नगरसेवक गायब असून, राष्ट्रवादी तसेच मनसेचे अनेक नगरसेवक शिवसेनेने गळाला लावले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महायुतीची मदार अन्य पक्षांतील गद्दारीवर अवलंबून आहे. अपक्षांची भूमिका यात मोलाची असून, युती आणि आघाडी दोघेही अपक्ष आपल्याबरोबर असल्याचे सांगितले जात आहे. सर्वच पक्ष बहुमताचा दावा करीत असले तरी खरे चित्र सभागृहातच दिसणार असून, त्याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.
जोड