नाशिक मर्चंट बॅँक:   मतदारांचा निरुत्साह; पोलिसांचा उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 01:13 AM2018-12-24T01:13:19+5:302018-12-24T01:13:41+5:30

नाशिक मर्चंट को आॅप. बॅँकेच्या निवडणुकीत मतदारांचा निरुत्साह असला तरी पोलिसांचा उत्साह मात्र दांडगा होता. शिवाजी उद्यानासमोरील बाजूस दीपसन्स कॉर्नरकडून सारडा शाळेकडे जाण्यास प्रतिबंध होता.

Nashik Merchant Bank: Dull Voters; Police enthusiasm | नाशिक मर्चंट बॅँक:   मतदारांचा निरुत्साह; पोलिसांचा उत्साह

नाशिक मर्चंट बॅँक:   मतदारांचा निरुत्साह; पोलिसांचा उत्साह

googlenewsNext

नाशिक : नाशिक मर्चंट को आॅप. बॅँकेच्या निवडणुकीत मतदारांचा निरुत्साह असला तरी पोलिसांचा उत्साह मात्र दांडगा होता. शिवाजी उद्यानासमोरील बाजूस दीपसन्स कॉर्नरकडून सारडा शाळेकडे जाण्यास प्रतिबंध होता. तसेच दीपसन्स समोरदेखील बॅरिकेड टाकून रस्ता बंद होता. त्यामुळे नागरिकांचे हाल झालेच, परंतु मतदान केंद्रासमोर कोणी उभे राहिले तरी त्यांना पळवून लावले जात होते. मतदान केंद्राच्या प्रतिनिधींनाही दूर करण्यात आल्याने सर्वच पॅनलच्या उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली.
सदरची निवडणूक ही केवळ एका बॅँंकेची असली तरी पोलीस यंत्रणेने याठिकाणी लोकसभा किंवा महापालिका निवडणुकीसारखे स्वरूप दाखवून निर्बंध घातले होते. सागरमल मोदी शाळेतील मतदान केंद्रांवर सुमारे सहा हजार मतदान होते. शहरातील मध्यवर्ती भागाचे मतदान या भागातील असल्याने सर्वच उमेदवारांचे त्याकडे लक्ष होते. तथापि, पोलिसांनी सार्वत्रिक निवडणुकीपेक्षा अधिक नियम करीत मतदान केंद्रे दूरवर उभारण्यास लावली. दीपसन्स ते सारडा शाळेच्या दरम्यान रस्त्यावर कोणालाही येण्यास मनाई केली होती. कोणी मतदार आल्यानंतर उमेदवारांना त्यांच्याशी बोलू दिले जात नव्हते.
शिवाजीरोडच्या वाहतुकीला पोलिसांच्या निर्बंधाचा फटका बसला. शिवाजी गार्डन ते शालिमार चौकदरम्यान एकाच रस्यावरून दुहेरी वाहतूक सुरू केल्याने वाहतूक संथगतीने सुरू होती तसेच कोंडीही होत होती. शिवाय दुकानदारांनादेखील त्याचा फटका बसला. मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांच्या दुचाकी किंवा मोटारी लावण्यासही जागा नव्हती. त्यामुळे त्यांना जागेचा शोध घ्यावा लागत होता. एकूणच पोलिसांनी अतिदक्षता घेतल्याने नागरिकांसह सायंकाळपर्यंत सर्वांचीच गैरसोय झाली.
असाच प्रकार गोरेराम लेनमध्येही घडला. गोरेराम लेनमधील शाळेत असलेल्या केंद्रासाठी मातोश्री मंगल कार्यालयाजवळ बॅरिकेड उभारण्यात आल्याने तेथून पोलिसांनी दुचाकीही आतमध्ये येऊ दिली नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांचे हाल झाले. दरम्यान, याचठिकाणी उमेदवार तसेच कार्यकर्त्यांच्या मोटारी उभ्या असल्याने अन्य खासगी वाहने मध्ये सोडण्यात आली नाही. त्यामुळे वयोवृद्ध सभासद मतदारांना मतदान केंद्रापर्यंतदेखील जाता आले नाही.
अखेरच्या क्षणापर्यंत प्रचार, मतदारांची वाहतूकही...
सहकार क्षेत्रातील या बॅँकेच्या निवडणुकीत अन्य सार्वत्रिक निवडणुकांप्रमाणे आचारसंहिता नसल्याने बॅँकेची निवडणूक संपेपर्यंत प्रचार सुरू होता. विशेषत: मोबाइलवरून एसएमएस त्याचप्रमाणे मतदारांना मतदान केले नसेल तर तत्काळ मतदान करा, असे संदेश दिले जात होते. विशेष म्हणजे एकाच घरातील अनेक जण मतदार असेल तर उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोटारीतून मतदारांची वाहतूक सुरूच ठेवली होती. त्यामुळे सार्वत्रिक निवडणुकीचा प्रत्यय येत होता.
दोन दिवस लागणार मतमोजणीला
सुमारे पावणे दोन लाख मतदार व ८२ उमेदवार रिंगणात असलेल्या मर्चंट बॅँकेच्या निवडणुकीसाठी रविवारी सायंकाळी पाच वाजता मतदान संपुष्टात येऊन सर्वच उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.
उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी सायंकाळनंतर गाव व मतदान केंद्रनिहाय झालेल्या मतदानाची आकडेवारी गोळा करून विजयाचे गणित मांडण्यास सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत मतपेट्या पोलीस बंदोबस्तात नाशिक मुक्कामी आणण्यात आल्या.
बुधवारी सकाळपासून या निवडणुकीच्या मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. मतपत्रिका असल्यामुळे व उमेदवारांची संख्या अधिक असल्यामुळे प्रारंभी सर्व मतपेट्यांमध्ये झालेले मतदान व त्यावर मतदान प्रतिनिधींनी केलेल्या स्वाक्षरीनिहाय तंतोतंत जुळते की नाही याची खात्री केली जाईल व त्यानंतर सर्व मतपेटीतील मतदान एकत्र करून त्याचे प्रत्येक २५ मतपत्रिकानिहाय गठ्ठे केले जातील.
या गठ्ठ्यानंतर त्यातील वैध-अवैध मतपत्रिका वेगळ्या करून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात केली जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सायंकाळपर्यंत मतमोजणीचा हा पहिला टप्पा पूर्ण करण्यात येईल व त्यानंतरच प्रत्यक्ष मतमोजणी केली जाईल.
मतदानाची टक्केवारी पाहता गुरुवारी दुपारनंतर निवडणुकीचा कल हळूहळू बाहेर पडेल. त्यामुळे निवडणुकीचे चित्र शुक्रवारी स्पष्ट होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना पाच दिवसांची प्रतिक्षा करावी लागेल.

Web Title: Nashik Merchant Bank: Dull Voters; Police enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.