मिरजकर सराफ, त्रिशा जेम्सच्या फरार संचालकांविरोधात रेडकॉर्नर नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 10:41 PM2018-07-30T22:41:29+5:302018-07-30T22:46:11+5:30
नाशिक : आर्थिक व सुवर्ण तारणावर दरमहिना एक ते दीड टक्के व्याजाचे आमिष दाखवून मिरजकर सराफ व गंगापूररोडवरील त्रिशा जेम्सने गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे़ आर्थिक गुन्हे शाखेकडे आतापर्यंत ५०० गुंतवणूकदारांनी फसवणुकीच्या तक्रारी केल्या असून, गुंतवणूकदारांची संख्या हजारपर्यंत तर फसवणुकीची रक्कम शंभर कोटींपर्यंत असल्याची माहिती सोमवारी (दि़३०) गुंतवणूकदारांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन दिली़ दरम्यान, या दोन्ही फर्ममधील फरार संचालकांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे़ याबरोबरच संचालकांचे बँक खाते गोठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, या पेढ्यांमधील डाटासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली जाणार आहे़
अॅड. पल्लवी उगावकर-केंगे यांच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मिरजकर सराफी पेढीचे महेश मिरजकर, हर्षल नाईक यांच्यासह ११ संचालक-कर्मचाऱ्यांविरोधात १९ जुलै रोजी फसवणूक तसेच महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी)गुन्हा दाखल करण्यात आले आहे़ यातील फसवणुकीची रक्कम अधिक असल्याने हा गुन्हा शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे़ आतापर्यंत सुमारे पाचशे गुंतवणूकदार पोलिसांपर्यंत पोहोचले असून, फरार संचालकांपर्यंत अद्याप पोलीस पोहोचलेले नाहीत़
मिरजकर व त्रिशाचे संचालक विदेशात फरार होऊ नये यासाठी गृहविभागाने रेडकॉर्नर नोटीस जारी केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे़ याबरोबरच फरार संचालकांच्या ज्या-ज्या बँकांमध्ये खाते आहे त्या बँकांकडे पत्रव्यवहार करण्यात येऊन ती खाती गोठविण्यासंदर्भातील पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान, येत्या काही दिवसांत फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची एकत्रित बैठक पोलिसांकडून घेतली जाणार आहे़
अवैध सराफी योजना रडारवर
मिरजकर व त्रिशा जेम्समधील फसवणुकीनंतर पोलीस सतर्क झाले असून, शहरातील सराफी व्यावसायिकांमार्फत चालविल्या जाणाºया योजनांची माहिती घेतली जाणार आहे़ ज्या सराफी व्यावसायिकांकडे अवैध योजना सुरू असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले़
बहुतांशी गुंतवणूक नोटाबंदी कालावधीतील
मिरजकर सराफ व त्रिशा जेम्समध्ये काही गुंतवणूकदारांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे़ या गुंतवणूकदारांना आर्थिक परतावा न देता या दोन्ही फर्मच्या संचालकांनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे़ तर नोटाबंदीच्या काळात मोठी गुंतवणूक झाल्याची चर्चा आहे़
स्थावर मालमत्तेचा शोध सुरू
फरार संशयितांची बँकेतील खाते तसेच स्थावर मालमत्तेचा शोध सुरू आहे़ याबाबत नागरिकांना माहिती असल्यास त्यांनी बिनदिक्कतपणे पोलिसांना माहिती द्यावी़ माहिती देणाºयाचे नाव गुप्त ठेवले जाणार आहे़ नागरिकांना गुंतवणूक करताना योग्य ती काळजी घ्यावी तसेच अशाप्रकारच्या फसव्या योजनांमध्ये गुंतवणूक करू नये.
- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त.