नाशिक मनसेत नाराजीनामा नाट्य! अनेक पदाधिकारी राजीनामे देण्याच्या तयारीत
By संजय पाठक | Published: February 27, 2024 05:39 PM2024-02-27T17:39:07+5:302024-02-27T17:39:50+5:30
नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला असून, पक्षाच्या स्थापनेनंतर शहरातून तीन आमदार निवडून आले होते.
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने यंदा लाेकसभा निवडणूक लढवण्याची जय्यत तयारी सुरू असताना नाशिकच्या बालेकिल्ल्याला अंतर्गत हादरे बसू लागले आहेत. नाशिक लोकसभा संघटक किशोर शिंदे यांनीच गटबाजीकरून आपल्या जनसेवा कक्षातील पदाधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारिणीत घेण्याची तयारी केल्याने काही पदाधिकाऱ्यांनी नाराजीनामा अस्त्र उगारले. त्यांची समजूत काढून पदाधिकारी नियुक्तीचा निर्णय तातडीने मागे घेण्यात आला.
त्यामुळे तूर्तास वाद शमला आहे.
नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला असून, पक्षाच्या स्थापनेनंतर शहरातून तीन आमदार निवडून आले होते. त्यानंतर महापालिकेत ४० नगरसेवक देखील निवडून
आल्याने राज्यातील पहिली महापालिका काबीज करण्याची संधी मनसेला मिळाली होती; मात्र त्यानंतर पक्षात गटबाजी सुरू झाली आणि पक्षाची वाताहत झाली. पक्षाला नियंत्रित करणारे मुंबईतील पदाधिकारी स्थानिक गटबाजीत सहभागी हाेत असल्याने सामान्य कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. सध्या पक्षाने लोकसभा
संघटक म्हणून किशोर शिंदे यांची नियुक्ती केली आहे. येत्या ९ मार्च रोजी पक्षाचा वर्धापनदिन नाशिकमध्ये साजरा हेात असून राज ठाकरे स्वत: पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत. त्याच्या तयारीसाठी किशोर शिंदे यांना नाशिकला पाठविण्यात आले हेाते. त्यावेळी हा वाद उफाळून आला.